अजमेरा कॉलनीत पालिकेचे नवे नेत्र रुग्णालय
By admin | Published: August 4, 2016 01:28 AM2016-08-04T01:28:31+5:302016-08-04T01:28:31+5:30
अजमेरा कॉलनी पिंपरी येथे रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नेत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
पिंपरी : अजमेरा कॉलनी पिंपरी येथे रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नेत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे. पाच कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यापूर्वी या ठिकाणी कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव होता. परंतु, त्याऐवजी नेत्र रुग्णालयाचा प्रस्ताव पुढे आला असून, प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले.
महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे हे पहिलेच नेत्र रुग्णालय आहे. एखाद्या आजारासाठी स्वतंत्र महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय अद्यापपर्यंत कोठेही उभारलेले नाही. अजमेरा कॉलनीत २० खाटांचे हे नेत्र रुग्णालय, तसेच ३० खाटा अर्बन हेल्थ सेंटरसाठी असे मिळून ५० खाटांचे हे रुग्णालय साकारले जात आहे. प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. महिनाभरात स्थापत्य विभागाकडून इमारतीचे काम सुरू होईल, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. कर्करुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, महापालिकेकडून कॅन्सर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. त्याबद्दल उदासीनता दाखवली गेली. मध्यंतरीच्या काळात खासगी रुग्णालयासाठी ही जागा देण्याच्या हालचालीही झाल्या. निविदाही आल्या, परंतु खासगी डॉक्टरांनी, संस्थांनी गांभीर्याने या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला नाही. (प्रतिनिधी)
>वयोवृद्धांची प्रतीक्षा संपणार
अजमेरा कॉलनीत स्वतंत्र रुग्णालय झाल्यास नेत्र रुग्णांची चांगली सोय होणार आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये जेथे सर्व आजारांवर उपचार केले जातात, अशा ठिकाणी गेल्यास रांगा लावूून थांबावे लागते. मोतीबिंंदू, काचबिंदू अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी येणारे रुग्ण प्रामुख्याने वयोवृद्ध असतात. त्यांना वायसीएम, तालेरा अशा रुग्णालयांमध्ये रांगा लावून थांबावे लागते. नेत्ररोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यास शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातात. अशा प्रकारे होणारी रुग्णांची गैरसोय स्वतंत्र रुग्णालय झाल्यास टळणार आहे.
>आधुनिक सोयी-सुविधा
नेत्ररुग्णांसाठी अत्याधुनिक अशी वैद्यकीय उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नेत्रचिकित्सा, तसेच शस्त्रक्रिया आदी उच्च दर्जाच्या सुविधा या रुग्णालयात असतील. अजमेरा कॉलनीत २० खाटांचे नेत्र तसेच ३० खाटांचे अर्बन हेल्थ सेंटरसाठी अशी रचना असेल.