बुटीबोरी-वर्धा राज्याचा नवा आर्थिक झोन, देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 04:18 AM2017-10-03T04:18:43+5:302017-10-03T04:18:57+5:30
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल
वर्धा : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टद्वारा संचालित सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्ट हा व्यवसायाच्या दृष्टीने वर्धावासीयांसाठी मैलाचा दगड आहे. या ड्राय पोर्टमुळे शेतक-यांच्या उत्पादनाला देशपातळीवरील बाजारपेठ मिळेल. यामुळे बुटीबोरी आणि वर्धा हा राज्यमार्ग राज्याचा नवा आर्थिक झोन ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सोमवारी सेवाग्राम येथे बहुप्रतीक्षित सेवाग्राम विकास आराखडा आणि सिंदी (रेल्वे) येथील ड्राय पोर्टचे रिमोट कंट्रोलने भूमिपूजन झाले. यावेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, खा. रामदास तडास, खा. अजय संचेती, खा. विकास महात्मे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी यांचे विचार देशाला देण्यासाठी असलेल्या सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामांना सुरुवात झाली असून यातून पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे. महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील लघु उद्योगाच्या विकासाची कास धरली जात आहे.
वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ५ हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला. या कामांतून जिल्ह्याची ओळख देशपातळीवर होणार आहे. हा कापूस उत्पादकांचा भाग असून येथे विलस्पीन नामक कंपनी कपाशीवर प्रक्रिया करणार आहे. या प्रकल्पातून शेतकºयांच्या मुलांच्या हाताला रोजगार देण्याचे महत्त्वाचे काम होणार आहे, असे गडकरी म्हणाले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘संकल्प से सिद्धी’कडे जाताना सर्वसामान्यांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. देशाला स्वातंत्र्य देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या वर्धेतून देशविकासाचा हा मंत्र दिला गेल्यास महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
वर्धा जिल्ह्यात होणाºया ड्राय पोर्टमध्ये केवळ वर्धेतील युवकांनाच रोजगार देण्यात येईल. या रोजगारासाठी युवकांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी.
बाहेर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराकरिता कोणताही नेता चिठ्ठी देणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले.