कोळसा खाण गैरव्यवहार प्रकरणी नवा एफआयआर
By admin | Published: May 10, 2014 12:49 AM2014-05-10T00:49:08+5:302014-05-10T00:49:08+5:30
शुक्रवारी मुंबईत नोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी व त्यांच्या संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदविला
नवी दिल्ली : वर्ष १९९३ ते २००५ या दरम्यान केल्या गेलेल्या कोळसा खाणपट्टे वाटपातील कथित गैरव्यहरांच्या संदर्भात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) शुक्रवारी मुंबईत नोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी व त्यांच्या संचालकांविरुद्ध एफआयआर नोंदविला व मुंबई, नागपूर व यवतमाळसह सहा ठिकाणी धाडीही टाकल्या. कोळसा खाणपट्टे प्रकरणी सीबीआयने नोंदविलेला हा १९ वा एफआयआर आहे. मुंबईतील टॉपवर्थ ऊर्जा मेटल ही कंपनी, त्यांचे संचालक व कोळसा मंत्रालयाचे अज्ञात अधिकार्यांविरुद्ध हा गुन्हा नोंदविला गेला. आधी ही कंपनी विरांगणा स्टील लि. या नावाने ओळखली जायची व तिचे कार्यालय नागपूरमध्ये होते. या कंपनीस त्यांच्या स्पॉन्ज आयर्न कारखान्यासाठी महाराष्ट्रातील मार्की मंगली २,३ व चार या खाणपट्ट्यांचे वाटप ‘कॅप्टिव्ह माईन’ म्हणून करण्यात आले होते. या कंपनीने प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या आणि एका कंपनीशी खाणपट्टे भाडेतत्वावर वापरण्याचा करार केला व कंपनीची नाव बदलण्याची विनंतीही मंत्रालयाने मान्य केली. कंपनीच्या भांडवलदारांमध्येही बदल करण्यात आले. शिवाय स्पॉन्ज आयर्न कारखान्याची क्षमता न वाढविता कंपनीने प्रामाबाहेर कोळशाचे उत्खनन केले, असा सीबीआयचा आरोप आहे.