नव्या पिढीची नवी पत्रकारिता जोमात

By admin | Published: June 10, 2017 01:00 AM2017-06-10T01:00:39+5:302017-06-10T01:00:39+5:30

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार

A new generation of new journalism Jomat | नव्या पिढीची नवी पत्रकारिता जोमात

नव्या पिढीची नवी पत्रकारिता जोमात

Next

पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते.
बिन जेफ्रीच्या ‘इंडियाज न्यूजपेपर रेव्हल्यूशन’ या पुस्तकात तो दाखवतो की भांडवलशाही आणि माहिती व माध्यम तंत्रज्ञानामुळे भारतात वर्तमानपत्रांची कशी क्रांती होते आहे. भारतातील वर्तमानपत्रांचे जग हे जगातील इतर देशांपेक्षा फार वेगळे आहे. भाषा, विषय, कुठल्या घटनांचे रूपांतर बातमीत कशामुळे होते, वाचकांचा सामाजिक, राजकीय कल आणि आर्थिक परिस्थिती याचे जितके वैविध्य भारतात दिसते, तितके ते जगात इतरत्र कुठेही आढळत नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस सर्वाधिक लोक निरक्षर होते. साक्षरता हा युरो-अमेरिकन जगातील आधुनिक विचार. त्याचबरोबर सर्वाधिक लोक गरीब होते. ही गरिबी जवळ जवळ हजार वर्षांची होती. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळची आपली शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार इत्यादींची धोरणे त्या वास्तवाला धरून होती. आज परिस्थिती बदलली आहे. अर्ध्याहून अधिक लोक आता साक्षर आहेत. या समाजाने औपचारिक शिक्षण घेतले आहे. यात दिवसेंदिवस झपाट्याने भर पडत चालली आहे. याचा अर्थ येत्या दशकात भारतातील सर्वाधिक लोकसंख्या औपचारिक शिक्षण घेतलेली असेल.
भारतातील औपचारिक शिक्षण हे सर्वाधिक प्रमाणात सरकार देत होते. त्यामुळे औपचारिक शिक्षणाचा रोजगाराशी संबंध जोडण्याचे काम सरकारनेच केले. सरकारनेच सर्वाधिक रोजगार पुरविला. मात्र तसे करताना निकष सामाजिक आणि राजकीय लावले गेले. विषयज्ञान, अनुभव, कसब, कुशलता हे गौण होते. हळूहळू मात्र सरकारला हे ओझे पेलेनासे झाले आणि मग रीतसर नोकरकपातीला सुरुवात झाली. याच वेळी औपचारिक शिक्षण देणारी खाजगी यंत्रणा सुरू झाली. अर्थात ही बाहेरून जरी खाजगी वाटत असली तरी यामागे राजकारणी मंडळीच होती. आता यात व्यापारी आणि दुकानदार मंडळी आली आहेत. एक छोटा गट आहे धार्मिक संस्थांचा जो औपचारिक शिक्षणात काम करतो. मात्र हे सगळे जरी असले तरी रोजगारनिर्मिती अजूनही सरकारच करते आहे. आयटी क्षेत्र वगळता खाजगी क्षेत्र यात फारसे प्रभावी नाही.
पत्रकारिता हे असे क्षेत्र आहे ज्यातून सामाजिक, राजकीय स्तर वाढतो, सत्ता मिळते आणि आपला प्रभाव वाढतो. आधुनिक भांडवलशाहीचा प्रसार आणि तंत्रज्ञान यामुळे स्वत:चे वर्तमानपत्र काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आहे. वर्तमानपत्राच्या जोडीला आता वेबसाइट काढणे, यूट्यूब चॅनल काढणे, सोशल मीडियावर माहितीचा प्रसार करणे इत्यादीसुद्धा करता येते. यामुळे अनेक तरुण आता स्वत:चे वर्तमानपत्र काढताहेत. त्यांचे विषय, विषय हाताळणी, भाषा, वाचक, बातमीमूल्ये वेगवेगळी आहेत. आजपर्यंत भाषा, विषय, मूल्ये, नैतिकता, आर्थिक व व्यापारी गणिते, राजकीय आणि सामाजिक जबाबदारीच्या ज्या चौकटीत वर्तमानपत्रे वावरत होती ती सगळीच्या सगळी या नवीन पिढीने झुगारून देऊन स्वत:ची नवीन पत्रकारिता करायला सुरुवात केली आहे.
या सर्व प्रक्रियेतून जाताना भारतात संपूर्णपणे नवीन ‘नॅरेटिव्ह’ तयार होताहेत. पत्रकारितेतून समाज आपली कथा मांडत असतो. वर्तमानपत्र समाजाची अभिव्यक्ती असते. समाज आपले वास्तव मांडत असतो, ते वास्तव बदलत असते, त्यातून समाज शिकत जातो. प्रत्येक समाजाची चांगल्या जीवनाची स्वत:ची व्याख्या असते. ही व्याख्या आता बदलते आहे.या सगळ्यातून पैसा मिळेल काय? याचे उत्तर पैसा कशासाठी हवा आहे, या प्रश्नात आहे. या सगळ्यातून पुस्तके विकत घेण्यासाठी, प्रवास करण्यासाठी, माणसे जोडण्यासाठी, समाज, राजकारण, अर्थकारण समजण्यासाठी, समाजात प्रतिष्ठा मिळविण्यासाठी, माणूस म्हणजे काय हे समजण्यासाठी, आत्मभान मिळविण्यासाठी लागतो तेवढा पैसा आहे.
मग पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घ्यावे काय? तर निश्चित घ्यावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतातील औपचारिक शिक्षणाला संस्थांच्या मर्यादा असतात. प्रत्येक संस्थेच्या स्वत:च्या मर्यादा असतात. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्याला हे भान असले पाहिजे की अभ्यासक्रमाचा सर्वाधिक उपयोग त्याला स्वत:ला करायचा आहे. तो कसा, कशासाठी, किती करायचा हे जर निश्चित असेल तर कुठलाही अभ्यासक्रम कुठल्याही संस्थेत राबविला जात असला तरी त्यातून आपल्याला काय हवे आहे ते निश्चित काढता येते. औपचारिक शिक्षणाचा थेट संबंध रोजगाराशी आहे आणि प्रत्येक रोजगार क्षेत्र विशिष्ट आर्थिक चक्रात फिरत असते. त्यामुळे सध्या रोजगार कुठल्या परिस्थितीत आहे व आपण क्षेत्रात येऊ त्या वेळेस तो कुठल्या परिस्थितीत असेल याचे निश्चित भान मिळविणे आवश्यक असते. ते भान त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मिळविता येते.
टीप- सर्व प्रमुख विद्यापीठांसह प्रमुख महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पत्रकारितेचे धडे गिरवता येऊ शकतात. कोर्सेस आणि अभ्यासक्रमाची विपुल माहिती इंटरनेटवरून मिळवणे सहज शक्य आहे.
- डॉ. संजय रानडे
लेखक मुंबई विद्यापीठाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख आहेत

Web Title: A new generation of new journalism Jomat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.