ठाण्याच्या घराण्यांची नवी पिढीही सज्ज

By admin | Published: January 7, 2017 03:47 AM2017-01-07T03:47:33+5:302017-01-07T03:47:33+5:30

महापालिकेत गेली कित्येक वर्षे काही घराण्यांचे चांगलेच वर्चस्व दिसून आले

A new generation of Thane clan is ready | ठाण्याच्या घराण्यांची नवी पिढीही सज्ज

ठाण्याच्या घराण्यांची नवी पिढीही सज्ज

Next

अजित मांडके,
ठाणे- महापालिकेत गेली कित्येक वर्षे काही घराण्यांचे चांगलेच वर्चस्व दिसून आले. यामध्ये विचारे, वैती, भोईर, सरनाईक, साळवी, इंदिसे, शिंदे, पाटील आणि तरे यांचा वरचष्मा दिसून आला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीतही ही घराणेशाहीची परंपरा अबाधित राहणार असल्याचे चित्र असले तरी त्यांची नवी पिढी या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. काहींनी आपल्या घरातील अन्य नातलगांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे.
ठाणे महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर, काही घराण्यांची मंडळी जी आजही महापालिकेत सत्तेत आपला वाटा उचलताना दिसत आहे, यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचा प्रथम क्रमांक लागतो. महापालिका स्थापन झाल्यापासून ते २००७ पर्यंत त्या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. त्यानंतर, आता त्यांचे नातू मिलिंद पाटील यांचा नंबर लागला असून २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा त्यांची पत्नीदेखील निवडून आल्या. आता पुन्हा त्यांनी आगामी निवडणुकीसाठी नंबर लावला आहे. या घराण्यानंतर देवराम भोईर यांच्या घराण्याचा नंबर लागतो. महापालिकेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर देवराम भोईर सलग पाच वेळा महापालिकेवर निवडून आले. त्यानंतर २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे त्यांनी स्थायी समिती सभापतींबरोबरच विरोधी पक्षनेत्याची भूमिकादेखील बजावली आहे. भोईर यांचा प्रवास भाजपानंतर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी असा झाला आहे. तर, संजय भोईर यांनीही यात नंबर लावला असून ते देखील सलग चार वेळा निवडून आले आहेत. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची पत्नी उषा भोईर यादेखील निवडून आल्या आहेत. आता पुन्हा भोईर अ‍ॅण्ड कंपनीने निवडणूक लढवण्याची तयारी केली असून त्यांच्या घराण्यातील आणखी एक सदस्य या निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी तयार आहे.
वैती कुटुंबातील रमेश वैती यांनी यापूर्वी महापौरपदही भूषवले आहे. त्यांचे चुलत बंधू अशोक वैती हे सध्या नगरसेवक आहेत. त्यांनीदेखील उपमहापौर, महापौरपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली आहे. रमेश वैती यांची कन्या योगितादेखील २००७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यानंतर, प्रताप सरनाईक यांचे घराणेदेखील मागील काही वर्षांत चर्चेला आले आहे. राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सरनाईक यांनी नंतर सेनेत प्रवेश करून आमदारकी मिळवली. त्यामुळे रिक्त झालेल्या नगरसेवकपदासाठी त्यांनी आपली पत्नी परिषा सरनाईक यांना उतरवले. आता ही घराणेशाही आणखी वाढत जाणार असून विहंगपाठोपाठ आता त्यांचे दुसरे पुत्र पूर्वेश हेदेखील रिंगणात उतरणार आहे. वृंदावन आणि राबोडीच्या काही भागात गेल्या काही वर्षांपासून तरे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. तरे कुटुंबीयांची राजकारणातील एण्ट्री अनंत तरे यांच्यापासून झाली. अनंत तरे यांनी नगरसेवक, महापौरपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांचे बंधू संजय तरे यांनीदेखील नगरसेवकपद भूषवले होते. मात्र, २००७ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र, त्यांची पत्नी महेश्वरी तरे या निवडून आल्या. या दाम्पत्याने पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या घराण्यानंतर आता ठाण्यात हरिश्चंद्र पाटील यांच्या घराण्याचाही नंबर लागण्यास सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीत पाटील आणि त्यांची पत्नी कल्पना पाटील यांनी बाजी मारली होती. आता तर त्यांच्या घराण्यातील इतर सदस्यांनीदेखील निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी चार तिकिटांची मागणी केली आहे. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांच्या घराण्यातूनदेखील चार तिकिटांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विचारे हे मागील कित्येक वर्षांपासून आपले वर्चस्व राखून आहेत. मागील निवडणुकीत त्यांची पत्नी नंदिनी विचारे आणि त्यांचे पुतणे मंदार हे निवडून आले होते. आता आणखी काही सदस्यांसाठी त्यांनी पक्षाकडे दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. या दोन घराण्यांबरोबरच भोईर आणि सरनाईक घराण्यांनीदेखील चार तिकिटांची मागणी केल्याची माहिती समोर येत आहे.
काही प्रमुख पक्षांवर जरी नेहमीच घराणेशाहीचा आरोप होत असला, तरी तरूणांना संधी देण्याच्या नावाखाली किंवा प्रसंगी प्रभाग महिलांसाठी राखीव झाला की आपल्या कुटुंबातील सदस्यांना देण्याची केंद्र, राज्यातील परंपरा ठाण्यातही सुरू असल्याचे प्रत्यंतर वेळोवेळी येते. यावेळीही ते दिसेलच.
> या घराण्यानंतर नंबर लागतो रिपाइंच्या इंदिसे कुटुंबाचा.इंदिसे कुटुंबातील भय्यासाहेब इंदिसे, वनिता इंदिसे आणि दौप्रदाबाई इंदिसे हे सदस्य गेली काही वर्षे सत्ता उपभोगत आहेत. यातील भय्यासाहेब ऊर्फ नागसेन इंदिसे यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापतीपददेखील भूषवले आहे. आता पुन्हा हे घराणे लोकमान्यनगर भागातून निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी त्यांची तयारीही सुरू झाली आहे.
>साळवी, खारकर, शिंदे यांचाही वरचष्मा
कळव्यातील साळवी कुटुंबातील मनोहर साळवी यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून धुरा सांभाळली होती. त्यानंतर, आता त्यांचा पुत्र मिंिलंद साळवी हे सध्या स्वीकृत नगरसेवकपदाची धुरा सांभाळली होती. त्यांची पत्नी अपर्णा साळवी यादेखील नगरसेविका आहेत.
विटाव्यात काँग्रेसच्या खारकर बंधंूचे मागील काही वर्षांत वर्चस्व दिसून आले होते. परंतु, मागील निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागला आहे. काँग्रेसच्या शिंदे यांचा आवाजही सभागृहात नेहमीच गाजतो. यातील मनोज शिंदे गेली पाच टर्म निवडून आले आहेत. त्यांनीदेखील विरोधी पक्षनेतेपद भूषवले असून दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी आपल्या घराण्यातील शैलेश यांनादेखील राजकारणात उतरवले. २००७ मध्ये ते निवडून आले. आता पुन्हा हे बंधू आणि त्यांच्या घराण्यातील अन्य काही सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Web Title: A new generation of Thane clan is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.