महिला दिनी महिलांसाठी नवी मैत्रीण, थेट फोनने साधा ‘सुहिता’शी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 05:02 AM2018-03-07T05:02:53+5:302018-03-07T05:02:53+5:30
- विशेष प्रतिनिधी
मुंबई : पीडित महिलांशी थेट फोनवर संवाद साधणारी नवी सुहिता नावाची मैत्रीण राज्य महिला आयोगाकडून महिला दिनापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली. महिलांना एखाद्या प्रसंगी तातडीने मदत, समुपदेशनाची गरज असते. ग्रामीण भागातील महिला अनेक वेळा एखाद्या प्रसंगात कधी भीतीपोटी तर कधी अज्ञानामुळे अन्यायाची वाच्यता कुठेही करत नाहीत. त्यातून त्यांचा कोंडमारा होतो. मानसिक खच्चीकरण होते. म्हणूनच महिला आयोगाने ८ मार्चच्या महिला दिनी महिलांना ‘सुहिता’ची भेट दिली आहे. ही समुपदेशानासाठीची हेल्पलाइन आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून समोरच्या महिलेचे म्हणणे ऐकून तिचे समुपदेशन केले जाईल. तसेच तक्रारीचे स्वरूप जाणून घेऊन संबंधित जिल्ह्यातील संबंधित विभागाला या हेल्पलाइनमार्फत ई-मेल करून तातडीने माहिती देण्यात येईल. तसेच या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता असल्यास= आयोगामध्ये सुनावणीसाठीही बोलावण्यात येईल. या हेल्पलाइनवर जिने तक्रार केली आहे तिला तिच्या मोबाइलवर तिकीट नंबर मेसेज केला जाईल जेणेकरून त्याबाबत पाठपुरावा करणे सोपे होईल. हेल्पलाइनचे लोकार्पण ८ मार्चला आयोगाच्या मुंबई येथील
मुख्यालयात होणार आहे.
या नंबरवर साधा संपर्क
हेल्पलाइनसाठी ७४७७७२२४२४ हा फोन नंबर उपलब्ध करून
देण्यात आला असून कार्यालयीन कामकाजाच्या वेळात ही
हेल्पलाइन सुरू राहणार आहे. ती मराठी आणि हिंदी या दोन
भाषांमधून उपलब्ध असल्याने त्याचा फायदा शहरी तसेच
ग्रामीण महिलांनाही चांगल्या प्रकारे होणार आहे.