नव्या घरात पाहुणे, जुन्या घरात चोरटे
By admin | Published: March 20, 2017 03:21 AM2017-03-20T03:21:04+5:302017-03-20T03:21:04+5:30
वास्तू पूजनाचा कार्यक्रम सुरू असल्याने झनकलाल भीमराव उरकुडे (५९) यांच्या नंदनवनमधील नवीन घरात शनिवारी सायंकाळी
नागपूर : वास्तू पूजनाचा कार्यक्रम सुरू असल्याने झनकलाल भीमराव उरकुडे (५९) यांच्या नंदनवनमधील नवीन घरात शनिवारी सायंकाळी पाहुण्यांची गर्दी झाली होती. मात्र हा कार्यक्रम सुरू असतानाच उरकुडे यांच्या जुन्या घरात शिरून चोरट्यांनी रोकड आणि दागिने लंपास केले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही विरोधाभासी घटना घडली.
वीज मंडळातील निवृत्त अभियंता उरकुडे आतापर्यंत ते चैतन्यश्वर नगरात भाड्याच्या घरात राहात होते. तेथून काही अंतरावरच खरबी परिसरात त्यांनी नवीन घर बांधले. त्याच्या वास्तू पूजनाचा कार्यक्रम शनिवारी होता. त्यात उरकुडे परिवार गुंतला असताना इकडे चोरट्यांनी त्यांच्या जुन्या घरात धुमाकूळ घातला.
कपाटातील रोख २३ हजार, सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा सुमारे दीड ते दोन लाखांचा ऐवज घेऊन चोरटे लुटला. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री उरकुडे परिवार जुन्या घराकडे आले असता ही घरफोडी उघडकीस आली. (प्रतिनिधी)