न्यू इंडिया इन्शुरन्सला ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 03:41 AM2016-11-05T03:41:34+5:302016-11-05T03:41:34+5:30
अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला
ठाणे : अयोग्य कारण देऊन ग्राहकाचा नुकसान प्रतिपूर्ती दावा नाकारणाऱ्या दी न्यू इंडिया इन्शुरन्सला कंपनी लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने १५ हजाराचा दंड सुनावला आहे.
उल्हासनगर येथे राहणारे प्रदीपसिंग उलाख यांनी त्यांच्या वाहनाची दी न्यू इंडिया इंशुअरन्स कंपनीकडून २४ जानेवारी २००७ ते २३ जानेवारी २००८ या कालावधीसाठी विमा पॉलिसी काढली होती. याच दरम्यान उलाख यांनी ४ एप्रिल २००७ रोजी आपल्या वाहनातून अंबरनाथ येथील आगपेटी उत्पादक कंपनीचा माल वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेच्या माध्यमातून रामपूर येथे नेण्यासाठी घेतला. नाशिक येथे वाहन पोहचले असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरीला झाडाला ते धडकले आणि आगपेट्यांचे घर्षण झाल्याने वाहनाला आग लागली. अग्निशामक दलाने ती विझवली मात्र वाहनाचे नुकसान झाले.
उलाख यांनी नुकसानीचा प्रतिपूर्ती दावा इन्शुरन्स कंपनीकडे केला. मात्र सेफ्टी मॅचेस (आगपेटी)चा समावेश फ्लेमेबल गुडस्मध्ये होत असल्याने अशा वस्तूंची वाहतूक करण्यास वेगळी नोंदणी करावी लागते. वाहनचालकास वेगळे लायसन घ्यावे लागते; मात्र उलाख यांनी यातील कोणतीच बाब केलेली नाही अशी कारणे देऊन त्यांचा दावा नाकारण्यात येतो, असे इन्शुरन्स कंपनीने नोव्हेंबर २००८ रोजी पत्राद्वारे कळविले. वाहनाचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. आपला काही संबंध नाही, असे आगपेटी उत्पादक कंपनीने स्पष्ट केल्याने त्यांच्याविरोधातील तक्रार फेटाळण्यात आली. आमची नेमणूक केवळ मालाची वाहतूक करण्यासाठी केली होती, असे वरूणा रोडलाईन्स मालवाहतूक संस्थेने स्पष्ट केल्यावर त्यांच्याविरोधातील तक्रारही फेटाळली.
कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता वाहनाचा अपघात झाल्यावर इन्शुरन्स कंपनीने जळालेल्या मालाची पाहणी करण्यास सर्वेअर नेमला होता. त्यांनी पाहणी केली मात्र अपघात, त्याचे कारण, वाहन नुकसान याबाबतचा रिपोर्ट दिलेला नाही. तर इन्शुरन्स कं पनीने सेफ्टी मॅचेसचा समावेश फ्लेमेबेल गुडस्मध्ये होत असल्याचे कारण दिले असले तरी त्यांनी तशी नोंद असलेला यादीतील क्रमांक दिला नाही.
चुकीचे कारण दिल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने उलाख यांना ७,७८,९४७ रूपये ६ टक्के व्याजासह द्यावी आणि १५ हजार तक्रार खर्च द्यावा, असे आदेश मंचाने दिले आहेत.
(प्रतिनिधी)
चुकीच्या कारणाचा ठपका
मुळात फ्लेमेबल गुडस्च्या यादीत सेफ्टी मॅचेसचा उल्लेख नाही. सेंट्रल मोटर वाहन नियम शेड्युलमधील नोंदीनुसार सेफ्टी मॅचेस या जनरल गुडस्मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे चुकीचे कारण देऊन कंपनीने दावा नाकारला आहे, असे मंचाने स्पष्ट केले.