नक्षलग्रस्त जिल्ह्यासाठी नवे उद्योग धोरण तयार होणार
By Admin | Published: January 15, 2015 12:55 AM2015-01-15T00:55:18+5:302015-01-15T00:55:18+5:30
राज्यातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासह देशाच्या नक्षलग्रस्त भागात उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने नवी उद्योगनीती केंद्र राज्य सरकारच्या समन्वयातून तयार करण्यात येणार आहे.
उद्योजकांना मिळणार सवलत :
गडचिरोली : राज्यातील गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यासह देशाच्या नक्षलग्रस्त भागात उद्योगधंदे सुरू होण्याच्या दृष्टीने नवी उद्योगनीती केंद्र राज्य सरकारच्या समन्वयातून तयार करण्यात येणार आहे. यादृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असल्याचे संकेत राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
नक्षलग्रस्त भागासाठी नवी उद्योगनीती कार्यान्वित झाल्यास गेल्या २० वर्षांपासून रखडलेले गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिज व सिमेंट प्रकल्प मार्गी लागतील, अशी आशा आता निर्माण झाली आहे.
गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात तांबे, जस्त, डोलोमाईट, ग्रॅनाईट, क्वार्झाइट, अॅल्युमिनियम, हिरे, आॅप्टिकल क्वार्टझ्, चुनखडी, लॅटराईट, अभ्रक, दगडी कोळसा, डोलामाईट, कोरंडम आदींचे साठे आहेत.
यावर आधारित उद्योग या भागात सुरू होण्यास वाव आहे. मात्र वन संवर्धन कायदा यासाठी अडचणीचा ठरत आहे. तसेच नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात उद्योजक मागील १० वर्षांपासून उत्खननाची लिज मिळूनही उद्योग टाकण्याबाबत धजावलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांची हत्या केल्यानंतर येथे लिज घेतलेल्या अनेक कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने स्वतंत्र उद्योगनीती सुरू करून उद्योजकांना विविध करांमध्ये मोठ्या सवलती उपलब्ध करून दिल्यास या भागात उद्योग सुरू होण्यास वाव आहे. विद्यमान राज्य व केंद्र सरकार यादृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
लवकरच देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी ही उद्योगनीती लागू केली जाईल, असेही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात अशी आहे खनिज संपदा
गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा, मुरमाडी, कुराडी, महादवाडी, कुरपाळा, मुडझा तर कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी व सोनसरी येथील पहाडावर आणि आरमोरी तालुक्यातील वडेगाव परिसरात ग्रॅनाईट मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. वडसा शहरालगत ३० ते ४० हेक्टर परिसरात दगडी कोळसा आहे. एटापल्ली तालुक्यातील सुरजागडव्यतिरिक्त गडचिरोली तालुक्यातील गोगाव (अडपल्ली), आरमोरी तालुक्यातील देऊळगाव परिसरात लोहखनिज मुबलक प्रमाणात आहे. यातील लोहखनिजाचे प्रमाण १०० ग्रॅमच्या दगडातून ५६ ग्रॅम शुद्ध लोखंड मिळू शकते. अहेरी तालुक्यातील महागाव, पुसेर व कोरची तालुक्यातील मसेली परिसरात लोह खनिजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून १०० ग्रॅम दगडातून ७० ते ८० ग्रॅम शुद्ध लोखंड मिळू शकते. धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, उमरपाल, कुलभट्टी परिसरात तांबे तर मालेवाडा परिसरातील भूगर्भात जस्ताचे साठे आहेत. चामोर्शी तालुक्यातील घोट येथे कॉर्टझ् हे खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून काच निर्मितीच्या उपयोगात येऊ शकते. धानोरा तालुक्यातील कारवाफा परिसरात गारगोटीसारखा आॅप्टिकल क्वार्टझ् तर सावरगाव, कारवाफा परिसरात बर्फासारखा आॅप्टिकल क्वार्टझ् मोठ्या प्रमाणात आहे. चुरचुरा, पोर्ला व वडधा परिसरात ग्रॅनाईट व अॅल्युमिनियमचे साठे आहेत. टॉल्कम पावडरच्या निर्मितीसाठी लागणारा पांढरा दगड डोलोमाईट अहेरी तालुक्यातील देवलमरी, कमलापूर, आवलमरी व सिरोंचा परिसरात आढळतो. आरमोरी तालुक्यातील वैरागड आणि वाशी कुशी परिसरात हिऱ्याचे साठे उपलब्ध आहे.