गरज भासल्यास बैलगाडा शर्यतीसाठी नवा कायदा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:52 AM2021-08-25T08:52:08+5:302021-08-25T08:52:28+5:30

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार : शर्यत आणि सरावाबाबत महिनाभरात मार्ग काढणार

New law for bullock cart racing if needed by Maharashtra Govt | गरज भासल्यास बैलगाडा शर्यतीसाठी नवा कायदा 

गरज भासल्यास बैलगाडा शर्यतीसाठी नवा कायदा 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  बैलगाडी शर्यत आणि शर्यतींच्या सरावासाठी संविधान आणि घटनेचा आदर करत कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासंदर्भात महिनाभरात योग्य तो निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या ज्या राज्यात बैलगाडी शर्यत सुरु आहे त्यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच गरज भासल्यास यासाठी नवीन कायदा करण्याचाही सरकारचा विचार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह विविध संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रालयातील त्रिमूर्ती जवळच्या खुल्या प्रांगणात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु करण्याविषयक बैठक घेण्यात आली. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार शशिकांत शिंदे, निलेश लंके, किसन काथोरे, अनिल बाबर, संजय जगताप, संग्राम जगताप, संग्राम थोपरे यांच्यासह राज्यातील बैलगाडी मालक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री केदार म्हणाले की, राज्यात बैलगाडी शर्यतीची सांस्कृतिक परंपरा आहे. बैलगाडी शर्यतीच्या आवडीमुळे देशी जनावरांचे गाय आणि बैलांचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले जाते.

याकरिता बैलांचा सराव आणि शर्यत पूर्ववत सुरु करण्यासाठी महिनाभरात मार्ग काढण्यात येईल. राज्यात खिलार जातीचे बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही जात फक्त शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदास वाढविण्यासाठीही महत्त्वाची आहे. यामुळे देशी जनावरांच्या संगोपनास प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

कायदा सल्लागारांची मदत
खिलार बैल शर्यतीसाठीच नाही तर दूध उत्पादन आणि पैदाशीसाठीही महत्त्वाची आहे. सक्षमपणे न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ कायदा सल्लागारांचीही मदत घेतली जाणार आहे.

Web Title: New law for bullock cart racing if needed by Maharashtra Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.