मुंबईतील चौपाटयांना नवा लूक, शिडाच्या नौकांचे मॉडेल
By admin | Published: November 2, 2016 01:46 AM2016-11-02T01:46:24+5:302016-11-02T08:10:29+5:30
कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या मुंबईतील चौपाट्यांना नवा लूक मिळणार आहे
मुंबई : कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या मुंबईतील चौपाट्यांना नवा लूक मिळणार आहे. याची सुरुवात सिनेतारकांचे वास्तव्य असलेल्या जुहू चौपाटीपासून होणार आहे. शिडाच्या नौकांचे मॉडेल तयार करून या चौपाटीचा किनारा रंगीबेरंगी रोशणाईने उजळणार आहे. त्यामुळे मुंबईकर व शेकडो देशी-विदेशी पर्यटकांना समुद्राच्या फेसाळलेल्या लाटा, भेळपुरीचा आस्वाद आणि आकाशपाळण्याचा आनंद या चौपाटीच्या मोकळ्या आणि स्वच्छ हवेत पुन्हा एकदा लुटता येणार आहे.
गिरगाव, गोराई, जुहू, दादर, माहीम, अक्सा यांसह एकूण नऊ चौपाट्या मुंबईत आहेत. धकाधकीच्या जीवनात मुंबईकरांसाठी हे समुद्रकिनारे म्हणजे विरंगुळ्याचे हमखास ठिकाण. वीकेण्डच्या दिवशी चौपाट्या पर्यटकांनी तुडुंब फुललेल्या असतात. मात्र अनेकवेळा पर्यटक कचरा त्याच ठिकाणी टाकून जात असल्याने चौपाट्यांची कचराकुंडी झाली आहे. या ठिकाणी विदेशी पर्यटक येऊन छायाचित्रण करीत असल्याने मुंबईचे चुकीचे चित्र या कचराकुंडीच्या रूपाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचते, म्हणून चौपट्यांच्या स्वच्छतेबरोबरच त्यांना नवा लूक देण्यात येणार आहे.
आणखी वाचा
या मेकओवरसाठी निविदा मागविण्यात आल्या असून, २२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील चार महिन्यांत जुहू त्यानंतर दादर आणि गोराई चौपाटीचा कायापालट होणार आहे. (प्रतिनिधी)
अशी लकाकणार जुहू चौपाटी
जुहू येथील चौपाटी ४़ ५ कि.मी. लांबीची आहे. येथे गंजरोधक रंगाने रंगविलेले १२ मी़ उंचीचे शंभर खांब निश्चित अंतरावर बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर ४़ ५ मीटर उंचीवर टेन्साईल फॅब्रिकपासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेचे मॉडेल बसविण्यात येणार आहे.
या प्रत्येक नौकेच्या खालच्या बाजूने व नौकेच्या शिडामध्येही मंद प्रकाश देणारे व बदलते रंग असणारे चार दिवे बसविण्यात येणार आहेत. हे सर्व दिवे एलईडी असतील.
आंतरराष्ट्रीय चौपाट्यांचा अभ्यास
या मेकओवरसाठी पालिका अधिकारी गेले काही महिने अभ्यास करीत आहेत. अन्य देशांमध्ये असलेल्या चौपाट्यांची माहिती इंटरनेटद्वारे घेऊन तशी काही संकल्पना मुंबईतील चौपाट्यांवर राबविता येईल का? याचाही विचार सुरू आहे. यावर विशेषत: पालिकेचे अभियंते काम करीत आहेत. चौपाट्यांवर संध्याकाळच्या वेळी असलेली प्रकाशयोजना मंद असल्याने सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होतो, त्यामुळे यावरही विचार होत आहे.
सामाजिक संदेश : खांबावरती गोबो प्रोजेक्टर्स बसविण्यात येणार आहेत. याद्वारे समुद्राच्या भरतीच्या पाण्यावर व चौपाटीच्या वाळूवर गरजेनुसार सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत़
दर्यावर डोलणार होडी : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्या भोवतालच्या परिसरात आकर्षक अत्याधुनिक स्वरूपाची विद्युत रोशणाई करण्यात येणार आहे. तसेच येथे बसविण्यात आलेल्या खांबांचा व शिडाच्या नौकांचा आकार हा चौपाटीवरच्या हवेच्या वेगाला अनुरूप असेल, असे नियोजन करण्यात येत आहे.