नव्या मंत्र्यांचा मुक्काम सध्या विधान भवनात
By admin | Published: July 12, 2016 03:51 AM2016-07-12T03:51:13+5:302016-07-12T03:51:13+5:30
चार्ज घ्यायचा म्हणजे करायचे तरी काय, असा प्रश्न आज नव्या मंत्र्यांना पडला. तर काहींची सुरुवातच थेट बैठका घेण्याने झाली. काही मंत्र्यांनी सिद्धिविनायकाला साकडे घालून कामाची सुरुवात केली.
अतुल कुलकर्णी, मुंबई
चार्ज घ्यायचा म्हणजे करायचे तरी काय, असा प्रश्न आज नव्या मंत्र्यांना पडला. तर काहींची सुरुवातच थेट बैठका घेण्याने झाली. काही मंत्र्यांनी सिद्धिविनायकाला साकडे घालून कामाची सुरुवात केली.
आपल्याला कोणत्या मजल्यावरचे दालन मिळेल याची चाचपणी करत अनेक मंत्री मंत्रालयात आले खरे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतरच दालनांचे वाटप केले जाईल, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्यामुळे सर्व नव्या मंत्र्यांचा तात्पुरता मुक्काम विधान भवनात हलविण्यात आला.
अधिवेशन काळात मंत्र्यांना विधान भवनातील दालने दिली जातात. त्यातल्याच काही दालनांवर नव्या मंत्र्यांच्या नावाचे कागद चिकटवून त्यांच्या पाट्या तयार केल्या गेल्या; आणि या मंत्र्यांनी आपल्या दालनात प्रवेश केला.
संभाजी पाटील निलंगेकर निघाले तेव्हा घरच्यांनी विचारले की, ‘चार्ज घ्यायला जाताय का?’ विधान भवनात आल्यानंतर त्यांना कोणी चार्ज देणारेच नव्हते. मग एका अधिकाऱ्याने सांगितले की, आपण मंत्र्यांच्या खुर्चीवर बसा आणि काम सुरू करा, म्हणजे आपोआप चार्ज घेतल्याचे समजले जाईल. फारतर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून आपण चार्ज घेतल्याची बातमी काढायला लावा, असा सल्लाही दिला.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या दालनात आडत व्यापाऱ्यांच्या संपाबद्दल बैठक बोलावली होती. त्यासाठी नवे सहकारमंत्री सुभाष देशमुख तेथे पोहोचले. त्यांचे तेथे स्वागत झाले आणि त्यांनी बैठकीला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांचीही सुरुवात त्याच बैठकीने झाली. त्या बैठकीत कोणताच निर्णय न झाल्याने पुन्हा सायंकाळी बैठक घेण्याचे ठरले. सुभाष देशमुख यांनी दुपारचे जेवण नरिमन पॉइंट भागातील एका साध्या हॉटेलात घेतले.
मुख्यमंत्र्यांकडे असणारे पर्यटन खाते मिळालेले जयकुमार रावल मंत्रालयात फेरफटका मारून विधान भवनात गेले. पत्रकार, अधिकारी भेटले, की ते तुम्ही नक्की या, तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे आपुलकीने सांगताना दिसत होते. काही जुन्या मंत्र्यांनी त्यांच्याकडच्या खासगी सचिवांना दुसऱ्या मंत्र्यांकडे पाठवता येते का? याची चाचपणी सुरू केली होती.