पक्षीय आघाड्यांचा नवा नाशिक पॅटर्न
By admin | Published: March 15, 2017 12:29 AM2017-03-15T00:29:06+5:302017-03-15T00:29:06+5:30
एकमेकांविरोधात शिमगा करणाऱ्या राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर एकमेकांना पायघड्या घातल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन
नाशिक : एकमेकांविरोधात शिमगा करणाऱ्या राजकीय पक्षांनी स्थानिक पातळीवर एकमेकांना पायघड्या घातल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांमध्ये दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी परस्परांच्या गळ्यात गळे घालत सत्ता काबीज केल्याने पक्षीय सामिलकीचा नवा नाशिक पॅटर्नच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक मंगळवारी (दि.१४) झाली. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने सर्वाधिक (५) पंचायत समित्यांवर एक हाती सत्ता मिळवत भगवा फडकविला व ग्रामीण भागात आपले पाय मजबुतीने रोवले. पाचही ठिकाणी शिवसेनेचे निर्विवाद बहुमत आहे. मात्र दिंडोरी येथे कॉँग्रेसला उपसभापतीपद देऊन शिवसेनेने सभापतीपद तर देवळा येथे राष्ट्रवादीला सभापतीपद देऊन उपसभापतीपद मिळविले आहे.
शिवसेनेप्रमाणेच चांदवड तालुक्यात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी कॉँग्रेसशी हातमिळवणी करुन सभापतीपद मिळविले आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माकपाशी युती करुन आपल्या पदरात उपसभापतीपद पाडून घेतले आहे. देवळा पंचायत समितीत राष्ट्रवादीला शिवसेनेची साथ मिळाली असून दिंडोरी पंचायत समितीमध्ये कॉँग्रेसने शिवसेनेसमोर नांगी टाकत त्यांच्यासोबत थेट गट नोंदणी करुन उपसभापतीपद पदरात पाडून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असताना तसेच तालुक्यातील साखर कारखान्यासह अन्य संस्थांमध्ये सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत पंचायत समितीमधील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली गेली आहे. सटाणा (बागलाण) तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. १४ सदस्य संख्या असलेल्या बागलाण पंचायत समितीमध्ये भाजपाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता असताना भाजपाला येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन सदस्यांसह तब्बल ४ जणांची साथ मिळाली आहे.
नवी समीकरणे
नाशिक जिल्ह्यात युती व आघाडीची पारंपरिक समीकरणे मोडून पंचायत समित्यांमधील सत्तेसाठी जुळविली गेलेली नवी समीकरणे याप्रमाणे-
चांदवड : भाजपा - राष्ट्रवादी
त्र्यंबकेश्वर: माकपा-राष्ट्रवादी
देवळा : राष्ट्रवादी -शिवसेना
दिंडोरी : शिवसेना- कॉँग्रेस
सटाणा : भाजपा- राष्ट्रवादी
जिल्ह्यातील १५ पैकी इगतपुरी, पेठ, नांदगाव, येवला, दिंडोरी, सिन्नर, निफाड अशी सर्वाधिक सात सभापतिपदे शिवसेनेने मिळविली असून कळवण, मालेगाव, देवळा, नाशिक अशी चार सभापतिपदे राष्ट्रवादीला मिळाली आहेत. चांदवड व सटाणा येथील दोन भाजपाला तर त्र्यंबकेश्वर व सुरगाणा अशी दोन सभापतिपदे माकपाला मिळाली आहेत.