दुहेरी हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्याकडे
By admin | Published: December 25, 2015 04:23 AM2015-12-25T04:23:47+5:302015-12-25T04:23:47+5:30
प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरिश भंबानी यांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींची चौकशी करण्याची जबाबदारी आता तपासअधिकारी दिनेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
डिप्पी वांकाणी, मुंबई
प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरिश भंबानी यांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींची चौकशी करण्याची जबाबदारी आता तपासअधिकारी दिनेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिनेश कदम यांनी यापूर्वी अजमल कसाब, अबू जुंदाल, यासिन भटकळ, मारिया सुसाईराज आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या प्रकरणात चौकशी केलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाच्या कटात सहभागी असणाऱ्यांशी चिंतन हा आपल्या मोबाइलवरून बोलत नव्हता. तर अन्य मोबाइल वापरत होता. गुन्हे शाखेचे पोलीस सध्या चिंतनची चौकशी करत आहेत. चिंंतनने राजभरशी संपर्क साधतांना कायम वेगळ्या नंबरचे कार्ड वापरल्याचे दिसून येत आहे. कारण गुन्हे शाखेने या आरोपींच्या संपर्काचा डाटा जमा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना डाटा रेकॉर्ड मिळाला नाही.
आतापर्यंतच्या चौकशीत चारही आरोपींच्या बोलण्यात भिन्नता आढळून आली आहे. त्यामुळे पोलीस शुक्रवारी त्यांची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विद्याधरला पकडण्यासाठी पोलिसांनी राजस्थानात एक पथक पाठविले आहे. विद्याधरला लवकरच पकडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. विद्याधरची आई आणि पत्नी यांना गुरुवारी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
चिंतन वकील बदलणार? : चिंतनची बाजू सध्या अॅड. सतीश मानशिंदे हे मांडत आहेत. मात्र चिंतन वकील बदलणार असल्याची चर्चा आहे. चिंतनच्या घटस्फोटाचे प्रकरण हाताळणारे अॅड. नितीन प्रधान हेच चिंतनची बाजू मांडणार असल्याचे कळते.