स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नवा पक्ष
By admin | Published: January 17, 2016 02:17 AM2016-01-17T02:17:32+5:302016-01-17T02:17:32+5:30
विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ‘विदर्भ माझा’ नवीन पक्षाची स्थापना केली असून, राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी या पक्षाची औपचारिक घोषणा केली. २०१७ला होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेसह
नागपूर : विदर्भवादी कार्यकर्त्यांनी ‘विदर्भ माझा’ नवीन पक्षाची स्थापना केली असून, राजकुमार तिरपुडे यांनी शनिवारी या पक्षाची औपचारिक घोषणा केली. २०१७ला होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेसह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधानसभेच्या निवडणुका या पक्षाच्या माध्यमातून लढविण्यात येतील, अशी माहिती तिरपुडे यांनी दिली.
राजकुमार तिरपुडे यांनी पत्रपरिषदेत या नवीन पक्षाबाबत माहिती देताना, वेगळ्या विदर्भाच्या मागणीला आता राजकीय वळण देण्याची गरज निर्माण झाल्याचे सांगितले. विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असून, सर्वच संघटनांचे या पक्षाला समर्थन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकांमध्ये विदर्भातील जनता नवीन पक्षाच्या नेतृत्वात विरोधक म्हणून उभी राहणार नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्ष गंभीरतेने घेणार नाही, असा दावा त्यांनी केला. पक्षाचे संविधान आणि समित्या तयार आहेत. सहा दिवसांत कार्यकारिणीला अंतिम रूप देऊन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले.