महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:02 PM2023-01-23T14:02:21+5:302023-01-23T15:41:00+5:30
वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील अशी घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मुंबई - सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकराची पुढची पिढी वारसदार एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जातेय. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचं. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले.
तर वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केला. जी चळवळ आम्ही चालवत होतो तिला आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो. जिंकून आणणं हे मतदारांच्या हाती आहे. ते राजकीय पक्षाच्या हातात नाही. मात्र उमेदवारी देणे राजकीय पक्षाच्या हाती आहे. नातेवाईकांचे राजकारण जसं जसं वाढत गेले तसे गरीबांचे राजकारण बाजूला पडत गेले. भांडवलशाहीचे, लुटारुंची अशी सत्ता सुरू झाली. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होणार
मोदींनी भाजपामधील नेतृत्वही संपवले आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आले नाही. नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार. संकटात राजकीय नेतृत्व उभं राहते असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष स्वत:चं नेतृत्व उभे करत असेल तिथे आम्ही मदत करू. राजकारण हे मुद्देसूद, नितीमत्तेवर करू. शरद पवारांसोबत जुने भांडण, शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.