श्रीहरी अणेंचा नवा राजकीय पक्ष
By admin | Published: September 25, 2016 01:22 AM2016-09-25T01:22:08+5:302016-09-25T01:22:08+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत राज्याचे माजी महाधिवक्ते व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्य आघाडी (विरा) या राजकीय पक्षाची शनिवारी घोषणा केली. या पक्षाची लवकरच राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्यात येईल. यानंतर निवडणुका लढविल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ राज्य आघाडीतर्फे (विरा) लकडगंज येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला मार्गदर्शन करताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी ही घोषणा करताना, आगामी स्थाानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. १ मे २०१५ रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भ राज्य आघाडी स्थापन करण्यात आली होती. या संघटनेंतर्गत आतापर्यंत विदर्भ राज्यासाठी लढा देण्यात आला. परंतु केवळ आंदोलनमुळेच स्वतंत्र राज्य मिळत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय पर्याय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
विदर्भ राज्य आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच जागा लढवणार नाही. ज्या जागांवर लढणे शक्य आहे; त्याच जागा लढवणार असल्याचे अॅड. अणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
...तर फेरविचार
भाजपा व काँग्रेस हे दोघेही राजकीयदृष्ट्या आमच्यासाठी सारखेच पक्ष आहे. भाजपाने विदर्भ दिला तर पेढे वाटू. भाजपमध्ये एकाच माणसाची चालते ते म्हणजे नरेंद्र मोदी. परंतु ते दिल्लीत राहतात. त्यांना विदर्भ राज्य द्यायचे नाही, असे सांगून श्रीहरी अणे म्हणाले, भाजपाने दिल्लीत स्वतंत्र विदर्भाचा शासकीय ठराव आणला तर मात्र आपण आपल्या निर्णयाचा फेरविचार करू.
मराठा समाजाच्या मोर्चासंदर्भात अॅड. अणे यांना पत्रकारंनी विचारले असता ते म्हणाले, त्यांना आरक्षण मिळायला हवे, परंतु आरक्षणासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण हे निकष तपासून पाहावे व त्यांना आरक्षण द्यावे. दुसरा मुद्दा अॅट्रॉसिटीचा आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा कधीकधी दुरुपयोग होतो, ही बाब खरी असली तरी एकच समाज सातत्याने जातीय अत्याचाराला बळी पडत आहे, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.