‘दीपोत्सव’ प्रकाशनाचा सोहळाही ठरला नवा विक्रम
By admin | Published: November 6, 2015 02:30 AM2015-11-06T02:30:32+5:302015-11-06T02:30:32+5:30
महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असा ठसा उमटविलेल्या लोकमत ‘दीपोत्सव’चा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशन सोहळा रंगला. महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांत
मुंबई : महाराष्ट्राचा सांस्कृतिक मानबिंदू असा ठसा उमटविलेल्या लोकमत ‘दीपोत्सव’चा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रकाशन सोहळा रंगला. महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व जिल्ह्यांत ‘दीपोत्सव’चे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आणि हाही एक नवा विक्रम ठरला आहे.
‘दीपोत्सव’चा मुख्य प्रकाशन सोहळा लोकमतच्या वरळी कार्यालयात राज्याचे शिक्षण तसेच सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशभर वाचन संस्कृती कमी होत असतानाची चर्चा होत असताना लोकमत दीपोत्सवने मात्र खपाचे नवे उच्चांक स्थापन केले आहेत.
त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवाविषयी मोठी उत्सुकता मराठी जनमानसात निर्माण झाली आहे. नेहमीच्या कथा, कादंबऱ्यांपेक्षा अधिक सकस, प्रेरणादायी लिखाणामुळे दीपोत्सव नेहमीच चर्चेच्या अग्रस्थानी राहिला आहे. त्याचे वेगळेपण कायम ठेवत आज लोकमतने प्रकाशनाची अनोखी परंपरा निर्माण केली. तावडे यांनी हेच सूत्र पकडून वाचन संस्कृतीला ‘अच्छे दिन’ येणार असा आशावाद व्यक्त केला. (प्रतिनिधी)
औचित्य जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे
जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’तर्फे विनोद तावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन गंगाराम गवाणकर यांचा गौरव करण्यात आला. या वेळी नाट्य संमेलनाच्या व नाट्य परिषदेच्या अध्यक्षांना सरकारतर्फे राज्यात मोफत प्रवास, राहण्यासाठी गेस्ट हाऊस इत्यादी सोयी-सुविधा देणार असल्याचे तावडे यांनी जाहीर केले.
दिवाळी अंकाचे वाचन ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असल्याचे सांगत तावडे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत गप्पा मारत तरुणांमध्ये वाचन संस्कृती अधिक रुजवणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. रंगकर्मी गंगाराम गवाणकर यांनीही दिवाळी अंकाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
गवाणकर आणि राज्याचे माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माहिती संचालक शिवाजी मानकर उपस्थित होते. यावेळी लोकमत वितरण विभागाचे उपाध्यक्ष वसंत आवारे यांनी ‘दीपोत्सव’चे दीड लाख खपाचे लक्ष्य असताना त्याहून अधिक खप झाल्याचे सांगितले.
‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार ‘लोकमत’चे मुंबई विभागाचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी मानले. प्रकाशन सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची धुरा अतुल कुलकर्णी यांनी सांभाळली.