रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 21:58 IST2025-01-11T21:57:56+5:302025-01-11T21:58:56+5:30
बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत.

रवींद्र चव्हाणांवर भाजपाची नवी जबाबदारी; कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती
मुंबई - मंत्रिमंडळात डावलले गेलेले भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपाने पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी याबाबत पत्र काढून चव्हाण यांची निवड केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांना मिळेल अशी चर्चा होती कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. बावनकुळे यांच्या जागी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. परंतु पक्षाने चव्हाण यांना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नेमले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्षपद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच राहावे अशा हालचाली पक्षात सुरू होत्या. काही दिवसांपूर्वीच प्रदेश संघटनपर्व समितीचे प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या नियोजनाची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली.महाराष्ट्रात सध्या संघटनपर्व सुरू असून त्यात भाजपा सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे.
चंद्रकांत पाटील हे २०२२ मध्ये मंत्री होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष होते. ते मंत्री होताच दोनच दिवसात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यावेळी बावनकुळे १५ डिसेंबरला मंत्री झाले तरीही नवीन अध्यक्षांची नियुक्ती पक्षाने केलेली नाही. बावनकुळे यांनाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत अध्यक्ष ठेवावे, यासाठी काही नेते आग्रही होते. त्यावर तोडगा म्हणून पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांना नेमले आहे.
दरम्यान, बावनकुळे आणि चव्हाण हे दोघेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे आहेत. रवींद्र चव्हाण हे मराठा समाजाचे, तर बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत. बावनकुळे यांना मंत्रिमंडळात चौथे महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आता चव्हाण यांच्या रूपाने मराठा कार्यकारी अध्यक्ष बनवून भाजपाने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. उद्यापासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन होणार असून तत्पूर्वी केंद्रीय भाजपाने रवींद्र चव्हाण यांना नवी जबाबदारी दिली आहे.