वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 03:33 PM2022-08-22T15:33:30+5:302022-08-22T15:34:01+5:30

पुणे मनसेतील संघटनात्मक बदलानंतर अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाली.

New responsibility of MNS on Vasant More; Raj Thackeray active in upcoming lok sabha elections | वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह

वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह

Next

पुणे - आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात पुणे ग्रामीण भागातील मावळ, शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली आहे. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सहीनं पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. वसंत मोरे हे पुण्यातील कात्रज भागातील मनसे नगरसेवक आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून ते राज ठाकरेंसोबत आहेत.

मध्यंतरीच्या काळात वसंत मोरे यांना पक्षाने पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यानंतर मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत मशिदीवरील भोंगे हटवण्याचं आंदोलन हाती घेतलं. त्यावर मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शहराध्यक्ष पदावरून वसंत मोरे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली. मोरे यांच्याजागी साईनाथ बाबर यांना शहराध्यक्षपदी नेमण्यात आले. 

पुणे मनसेतील संघटनात्मक बदलानंतर अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना, भाजपासह अनेक पक्षांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. परंतु वसंत मोरे हे राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिवतीर्थवरील बैठकीत वसंत मोरे यांची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश आले. त्यानंतर कात्रज भागात मनसेचे नगरसेवक निवडून आणणार या भूमिकेतून ते काम करू लागले. त्यातच वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी नवी जबाबदारी देत बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठवलं आहे. 
 

Web Title: New responsibility of MNS on Vasant More; Raj Thackeray active in upcoming lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.