मंत्रालयातील दलालांना पायबंद; हालचालींवरही ‘एआय’ची नजर, प्रवेशासाठी नवीन पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 06:52 IST2025-01-03T06:52:01+5:302025-01-03T06:52:53+5:30
ज्या मजल्यावर काम त्याच मजल्याचा मिळणार आता पास... अन्य मजल्यावर गेल्यास उघडणारच नाही प्रवेशद्वार

मंत्रालयातील दलालांना पायबंद; हालचालींवरही ‘एआय’ची नजर, प्रवेशासाठी नवीन पद्धत
मुंबई : मंत्रालयातील दलालांना पायबंद घालण्याबरोबरच एका कामासाठी येऊन दिवसभर मंत्रालयात वाटेल तिथे फिरत बसणाऱ्यांना आता चाप लावला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्रालय प्रवेशासंदर्भात नवीन पद्धत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्रालयात ज्या मजल्यावर आणि ज्या खात्यात तुम्हाला काम आहे त्याच ठिकाणी जाण्यासाठीचा पास आता दिला जाईल. सध्या एका पासवर मंत्रालयात कुठेही फिरता येते. पण आता तसे करता येणार नाही. जेवढ्या वेळेचा आणि ज्या मजल्याचा पास दिलेला असेल त्या जागी व त्या वेळेतच फिरता येईल. ‘डीजी यात्रा’सारख्या यंत्रणेद्वारे फेस आयडेंडिफिकेशननेच प्रवेश मिळेल. अन्य कोणत्या मजल्यावर कोणी गेले तर तेथील प्रवेशद्वारच उघडणार नाही. या यंत्रणेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जे दलाल सातत्याने मंत्रालयात फिरत असतात त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे व संशयास्पद हालचालीदेखील टिपल्या जाणार आहेत. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता साैनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.
सामान्य माणसांची मंत्रालयात अडलेली कामे यापुढेही नक्कीच होतील. पण जी कामे जिल्हाधिकारी कार्यालय वा अन्य कार्यालयांमध्ये होऊ शकतात, त्यासाठी मंत्रालयात येण्याची गरज पडणार नाही. मंत्रालयात दलाल फिरतात, त्यांच्यावर यापुढे नजर कडक नजर असेल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय -
‘ती’ ४,८४९ एकर जमीन शेतकऱ्यांना परत मिळणार : शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४,८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे छोट्या आणि अल्प भूधारक अशा ९६३ शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन आता मुंबै बँकेतूनही होणार : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णय
- मंत्रालयाच्या प्रत्येक माळ्यावर सुरक्षा जाळी बसविणार. त्यानंतर मध्ये लावलेले सुरक्षा जाळे काढणार.
- मंत्रालय ते विधान भवन अशा भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. तेथे विधानभवनात जाणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रवेशाची व्यवस्था असेल.
या प्रश्नांचे काय?
- आमदारांसोबत दहाबारा कार्यकर्ते मंत्रालयात अनेकदा घुसतात. आमदार सुरक्षा रक्षकांना दमदाटी करून कार्यकर्त्यांना आत नेतात. हे थांबणार आहे का?
- मंत्रालयातील अधिकारी, पीए, पीएस यांच्याशी खास संबंध असलेले दलाल पास मॅनेज करून मंत्रालयात सहज पोहोचतात. त्याला चाप बसणार का?