ड्रोनच्या वापरासाठी नवी नियमावली; प्रतिबंधित क्षेत्रात बंदी
By admin | Published: April 30, 2016 04:28 AM2016-04-30T04:28:01+5:302016-04-30T04:28:01+5:30
भारतात आजकाल मोठे कार्यक्रम, क्रिकेट सामने तसेच लग्नसमारंभातही ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
मुंबई : भारतात आजकाल मोठे कार्यक्रम, क्रिकेट सामने तसेच लग्नसमारंभातही ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. पण ड्रोन म्हणजेच स्वयंचलित उडणारे साधन हे केवळ खेळणे नसून त्याच्या वापरासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. यासाठीच डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल आॅफ सिव्हिल एव्हीएशन) ड्रोन वापरासाठी नियमावली तयार करत आहे. ड्रोनमुळे होणारे अपघात टळावेत आणि प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
सरकारी क्षेत्राबाहेरील कोणत्याही संस्थेस किंवा व्यक्तीस ड्रोन उडविण्यासाठी डीजीसीएची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि नियमांचे पालन करावे लागणार आहे. ड्रोन वापरणाऱ्यांना यूआयएन (युनिक आयडेंटिफिकेशन नंबर) घेणे आवश्यक आहे. मात्र तुम्ही प्रतिबंध नसलेल्या क्षेत्रामध्ये २०० फुटांच्या खाली ड्रोनचा वापर करत असाल तर या परवानगीची तुम्हाला गरज नसेल. ड्रोनची खरेदी किंवा विक्री तसेच वापरावर आजवर फारसे निर्बंध घालण्यात आलेले नव्हते; मात्र सुरक्षेचा विचार करत डीजीसीएने अशा नियमांचा आधार घेतला आहे. डीजीसीएने तयार केलेल्या नियमावली आराखड्यामध्ये सूक्ष्म, लहान, विशाल असे ड्रोनच्या वजनानुसार प्रकारही केले आहेत. अमेरिकेने ड्रोन वापरणाऱ्यांची नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यानंतर जपाननेही ड्रोन वापरावर बंधने घातली आणि लोकवस्तीच्या प्रदेशात ती उडविण्यास मज्जाव केला. आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनेही असेच नियम तयार केले आहेत. ड्रोनच्या वाढत्या वापरामुळे भारतानेही या देशांप्रमाणे नियमावली तयार केली आहे.
>यूआयएन कोणाला मिळेल?
कोणताही भारतीय नागरिक किंवा ज्या संस्थेचे अध्यक्ष किंवा दोनतृतीयांश संचालक भारतीय आहेत अशांनाच ड्रोन वापरासाठी यूआयडी मिळेल.
ड्रोनसारखे कोणतेही स्वयंचलित वाहन वापरणाऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असावे तसेच त्यांना ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असेल.
>इंग्लंडही विचारात
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर जीनिव्हा येथून येणाऱ्या विमानातील वैमानिकाने विमानात ड्रोनसारखी वस्तू अडकल्याची तक्रार केली. या विमानात १३७ प्रवासी प्रवास करत होते.
ब्रिटिश सरकारने याची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी केली. वैमानिकांच्या संघटनेनेही ड्रोनसाठी कडक नियमावली करण्याची मागणी केली. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी वैमानिकांनी आणि तेथील राजकीय पक्षांनी केली आहे.