नूतन शालिवाहन शकवर्षाचा मंगळवारी प्रारंभ!
By Admin | Published: March 26, 2017 05:58 AM2017-03-26T05:58:36+5:302017-03-26T05:58:36+5:30
मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत असून
मुंबई : मंगळवार २८ मार्च रोजी सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी श्री शालिवाहन शके १९३९ हेमलंबीनाम संवत्सराचा प्रारंभ होत असून हे नूतन वर्ष शनिवार १७ मार्च २०१८ रोजी समाप्त होणार आहे आणि पुढच्या वर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.
या नूतन शालिवाहन शकवर्ष १९३९ मध्ये दोन चंद्रग्रहणे व दोन सूर्यग्रहणे अशी एकूण चार ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी सोमवार ७ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. तसेच बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. त्या वेळी खग्रास स्थितीमध्येच चंद्र उगवताना दिसणार आहे. खगोलप्रेमी छायाचित्रकारांनाही ती एक पर्वणी असणार आहे.
२१ आॅगस्ट २०१७ आणि १५ फेब्रुवारी २०१८ रोजी होणारी सूर्यग्रहणे मात्र भारतातून दिसणार नाहीत. या नूतन शक वर्षात १३ जून आणि ७ नोव्हेंबर अशा दोन अंगारकी चतुर्थी होणार आहेत. सुवर्ण खरेदी करणाऱ्यांसाठी ९ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर असे दोन गुरुपुष्ययोग असणार आहेत.
या नूतन वर्षी १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात गुरू ग्रह सूर्यतेजात लुप्त झाल्याने दिसू शकणार नाही. तेजस्वी शुक्र ग्रह १६
डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
या नूतन वर्षी सर्व सण-उत्सव मागील वर्षापेक्षा १०-११ दिवस अगोदर येणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नवीन वर्षात चांगला पाऊस
सोमवार ७ आॅगस्ट रोजी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे.
तसेच बुधवार ३१ जानेवारी २०१८ रोजी माघ पौर्णिमेच्या दिवशी होणारे खग्रास चंद्रग्रहणही आपल्याला दिसेल.
तेजस्वी शुक्र ग्रह १६ डिसेंबर २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ सूर्यतेजात लुप्त झाल्याने आपणास दिसू शकणार नाही. प्राचीन पद्धतीप्रमाणे सर्व पंचांगात पर्जन्य अंदाज दिलेले असतात. नूतन वर्षी पाऊस चांगला पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
सोमवारी रात्रीपासून बाप्पाचे दर्शन
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात हिंदू नवीन वर्षानिमित्त म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन दररोजच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी २८ मार्चला मंदिर पहाटे १.३0 ते रात्री १२ वाजेपर्यंत बाप्पाच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
या दिवशी पहाटेच्या आरतीची वेळ पहाटे ५ पासून ते ५.३0 पर्यंत ठेवण्यात आली आहे. तर नैवेद्याची वेळ दुपारी १२ ते १२.३0 पर्यंत ठेवण्यात आली आहे. सायंकाळची महापूजा आणि आरतीची वेळ ९ ते रात्री १०.१० अशी ठेवण्यात आली आहे आणि शेजारती ही मंगळवारी रात्री १२ वाजता होईल. गुढीपाडव्यानिमित्त करण्यात आलेल्या या बदलाची दखल भाविकांनी घ्यावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.