म्हातारीच्या बुटाला मिळणार लवकरच नवी चकाकी

By admin | Published: October 30, 2016 02:44 AM2016-10-30T02:44:08+5:302016-10-30T02:44:08+5:30

मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनमधील ‘म्हातारीच्या बुटा’ला नवी तुकतुकी येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लोकप्रिय बालगीतांवर आधारित रंगरंगोटीसह या ठिकाणी

New shine soon to get old woman's shoes | म्हातारीच्या बुटाला मिळणार लवकरच नवी चकाकी

म्हातारीच्या बुटाला मिळणार लवकरच नवी चकाकी

Next

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध हँगिंग गार्डनमधील ‘म्हातारीच्या बुटा’ला नवी तुकतुकी येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील लोकप्रिय बालगीतांवर आधारित रंगरंगोटीसह या ठिकाणी देशी झाडांची लागवड केली जाणार आहे. कमला नेहरू पार्क आणि फिरोजशाह मेहता या दोन्ही उद्यानांचे विहंगावलोकन करण्यासाठी तरुशिखर पायवाट मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे.
मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट, फिरोजशाह मेहता उद्यानात झाडातून साकारलेले प्राणी हे केवळ मुंबईकरच नव्हे तर विदेशी पर्यटकांसाठीही विशेष आकर्षण ठरले आहे. दरवर्षी या दोन उद्यानांना लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे या उद्यानांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. त्यात दोन्ही उद्यानांना जोडणारा पादचारी पूल, उद्यानांचे विहंगालोकन करता येईल अशी तरुशिखर पायवाट, कमला नेहरू पार्कमधील व्ह्यूइंग गॅलरीच्या विस्ताराचा समावेश आहे. तीन टप्प्यांत चालणारे हे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

दोन्ही उद्यानांना जोडणार पूल : दोन्ही उद्यानांमधून बी. जी. खेर मार्ग हा रस्ता जातो. या रस्त्यावर असणाऱ्या रहदारीमुळे एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात जाण्यासाठी रस्ता पार करणे कठीण जाते. ते लक्षात घेऊन या दोन्ही उद्यानांना जोडणारा पूल बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

- शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असलेल्यांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची आवश्यकता लक्षात घेऊन पायऱ्यांऐवजी उतार व कठडे असणारे पथ (रॅम्प वॉक) तयार करण्यात येणार आहे.

तरुशिखर पायवाट (कॅनोपी वॉक) : उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचा आणि सभोवतालच्या विहंगम दृश्याचा अनुभव देण्यासाठी उद्यानातील विविध वृक्षांच्या उंचीच्या पातळीवरून जाणारी ‘तरुशिखर पायवाट’ प्रस्तावित केली आहे. ‘स्कायवॉक’प्रमाणे उंचावरून जाणारी ही पायवाट लोखंडी खांब आणि तारांचे दोरखंड यांच्या आधाराने उभी केली जाणार आहे.

व्ह्युइंग गॅलरी : कमला नेहरू उद्यानामध्ये गिरगाव चौपाटीच्या बाजूने सध्या क्वीन्स नेकलेस पॉइंट, इको पॉइंट आणि अ‍ॅम्फी थिएटर पॉइंट या तीन ठिकाणी छोट्या व्ह्युइंग गॅलरी आहेत. आता कमला नेहरू उद्यानातील गिरगाव चौपाटीच्या बाजूची संपूर्ण बाजू ही ‘व्ह्युइंग गॅलरी’ स्वरूपात रूपांतरित करण्याचे प्रस्तावित केले आहे. या अंतर्गत ४०८ मीटर्स लांबीची ‘व्ह्युइंग गॅलरी’ करण्यात येणार आहे. या गॅलरीचे क्षेत्रफळ १६३२ चौरस मीटर एवढे प्रस्तावित आहे.

गीत चित्रे : म्हातारीच्या बुटाची तसेच दोन्ही तळ्यांच्या भिंतींची रंगरंगोटी करताना त्यावर बालगीते व लोकप्रिय गाण्यातील संकल्पना दिलखेचक पद्धतीने चित्रित करण्यात येणार आहे. यामध्ये ये रे ये रे पावसा (मराठी), मछली जल की रानी है (हिंदी), बाबा ब्लॅक शिप (इंग्रजी) यासारख्या गाण्यांचा समावेश आहे.

Web Title: New shine soon to get old woman's shoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.