...अन् 'त्या' सापाला देण्यात आलं तेजस ठाकरेंचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 03:13 AM2019-09-27T03:13:39+5:302019-09-27T06:50:05+5:30
पश्चिम घाटात लागला ‘ठाकरेंचा मांजऱ्या सर्प’ या नव्या दुर्मीळ प्रजातीचा शोध
मुंबई : फक्त झाडांवर राहणाऱ्या बेडकांची अंडी खाणाऱ्या मांजऱ्या सापाच्या नवीन प्रजातीचा शोध पश्चिम घाटात लागला आहे. वन्यजीव संशोधक वरद गिरी यांनी तेजस ठाकरे यांच्या या भागातील कार्याची दखल घेत त्यांचेच नाव या सापाला दिले आहे. त्यामुळे आता हा दुर्मीळ साप ‘ठाकरेंचा मांजऱ्या साप’ या नावाने ओळखला जाणार आहे.
जैवविविधता, खनिज संपत्ती यांनी समृद्ध असलेला व अनेक प्रजातींचा अधिवास असलेला पश्चिम घाट हा आकर्षण केंद्र आहे. पश्चिम घाटामध्ये १२५ वर्षांनंतर मांजऱ्या सर्पाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. नव्या सापाच्या प्रजातीचा शोध फाउंडेशन फॉर बायोडायर्व्हसिटी कन्झर्व्हेशनचे संचालक वरद गिरी आणि इतर वन्यजीव संशोधकांनी मिळून लावला आहे. हा साप दुर्मीळ असून जगामध्ये पहिल्यांदा या सापाची नोंद महाराष्ट्रातून करण्यात आली आहे.
वरद गिरी यांनी यासंदर्भात सांगितले की, तेजस ठाकरे यांनी पहिल्यांदा हा साप पश्चिम घाटामध्ये पाहिला होता. तेजस यांना हा साप वेगळा वाटला आणि त्याची माहिती त्यांनी मला दिली. त्यावर मी पुढे संशोधन सुरू केले. या सापाची बरीच माहिती तेजस ठाकरे यांनी दिली. सापाची नवी प्रजात शोधण्यामागे तेजस यांचा मोठा हातभार आहे. त्यामुळे त्यांचे नाव सापाला देण्यात आले. १८९४ साली पश्चिम घाटामध्ये मांजऱ्या सापाचा शोध लागला होता. त्यानंतर आता १२५ वर्षांनंतर पुन्हा नव्या प्रजातीचा शोध लागला. घनदाट जंगलामध्ये हा साप आढळत असून रात्रीच्या वेळी सक्रिय असतो. तसेच ही नवी प्रजात बिन विषारी असून साधारण तीन फुटांपर्यंत तिची वाढ होते.