आंबोलीत हिरण्यकेशी नदीपात्रात आढळली माशाची नवीन प्रजात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 10:27 AM2020-10-16T10:27:44+5:302020-10-16T19:58:54+5:30
Schistura hiranyakeshi, fish, wildlife, Amboli hill station, sindhudurg, environment आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील या (Schistura hiranyakeshi) स्चीस्टुरा हिरण्यकेशी माशाची नवीन प्रजात डॉ. प्रविनराज जयसिम्हन, शंकर बालसु ब्रमनिअन, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगाच्या समोर आणली आहे.
आंबोली/कोल्हापूर : आंबोलीतील हिरण्यकेशी नदीपात्रातून गोड्या पाण्यातील या (Schistura hiranyakeshi) स्चीस्टुरा हिरण्यकेशी माशाची नवीन प्रजात डॉ. प्रविनराज जयसिम्हन, शंकर बालसु ब्रमनिअन, तेजस ठाकरे या संशोधकांनी संशोधनाअंती जगाच्या समोर आणली आहे.
आंबोली हे गाव पश्चिम घाटामध्ये जैवविविधता दृष्ट्या अतिशय संपन्न व संवेदनशील समजल जात. या ठिकाणी नेहमीच विविध क्षेत्रातील संशोधकांकडून संशोधन करण्यात आली आहे.
यामध्ये विविध प्रकारचे बेडूक, साप, पक्षी, फुलपाखरे, वनस्पती यांच्या नवनवीन प्रजाती संशोधनाअंती जगाच्या समोर आली आहे. यातल्या काही प्रजाती तर जगाच्या पाठीवर केवळ आंबोलीमध्ये सापडतात, त्यामध्येच आणखी एक म्हणजे या गोड्या पाण्यातील माशाची भर पडली आहे.
हिरण्यकेशी कुंडामध्ये सापडल्याने माशाला नदीचेच नाव
हा मासा सध्यातरी हिरण्यकेशी येथील उगमापाशी असलेल्या कुंडामध्ये आढळून आलेला आहे. अद्याप या माशाची नोंद इतरत्र कुठेही आढळून आलेली नाही. हा मासा हिरण्यकेशी नदी पात्रात सापडल्याने या माशाला या नदीच्याच नावावरून हे स्चीस्टुरा हिरण्यकेशी (Schistura hiranyakeshi) असे नामकरण करण्यात आले आहे.
आंबोलीच्या नावांमध्ये या संशोधनामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे हेही या संशोधनात सहभागी असल्याने महाराष्ट्रातील विविध संशोधकांकडून आनंद व्यक्त होत आहे.
तेजस ठाकरेंचे आंबोलीत संशोधन
आंबोलीत आढळलेल्या या दुर्मीळ माशाविषयी ‘ॲक्वा इंटरनॅशनल जर्नल ऑफ इक्थिऑलॉजी’मध्ये संशोधनपर प्रबंध प्रसिद्ध झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस यांना राजकारणापेक्षा पर्यावरण, जंगलात फिरणे, विशेषत: सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त रुची आहे. ते संशोधक आहेत. आंबोली परिसरात २००५ पासून त्यांनी २० प्रजातींचा शोध लावला आहे. त्यांतील सरपटणाऱ्या चार प्राण्यांचा शोध त्यांच्या नावे आहे.
गेली काही महिने मी या विषयावर मत्स्यछायाचित्रे टिपणारे शंकर बालसुब्रह्मण्यम् आणि तरुण आणि समर्पित मत्स्यवैज्ञानिक डॉ. प्रवीणराज जयसिम्हण यांच्यासोबत काम करीत आहे. आंबोली येथील प्राचीन हिरण्यकश्यपू मंदिराच्या आवारात असलेल्या नैसर्गिक कुंडात हा अनोखा मासा आढळला आहे. सुवर्णकेशसंभाराला संस्कृतमध्ये ‘हिरण्यकेशी’ म्हटले जाते. पूर्ण वाढीच्या माशामध्ये हा सुवर्णरंग दिसतो; म्हणून या माशाला या नदीचे नाव दिले आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेले हे वैभव आपण जतन केले पाहिजे.
- तेजस ठाकरे,
संशोधक.