इयत्ता बारावीच्या नव्या अभ्यासक्रमात ‘कोरोना’ला अनुल्लेखाने मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 06:22 AM2020-04-11T06:22:09+5:302020-04-11T06:22:24+5:30
क्रमिक पुस्तक : ‘कोविड-१९’ची माहिती मिळविण्याचा प्रोजेक्ट
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूला महाराष्ट्रातील अभ्यासक्रम तयार करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांनी अनुल्लेखाने मारले आहे. बारावीच्या नव्या अभ्यासक्रमात केवळ चार ओळींपुरता कोरोनाचा समोवश करून उर्वरित माहिती गोळा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच लोटली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक सत्रापासून बदलणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाने बालभारतीने ही सर्व पुस्तके आॅनलाईन पीडीएफ स्वरुपात खुली केली आहेत.
बारावीच्या जीवशास्त्राच्या नव्या पुस्तकात ‘हुमन हेल्थ अॅण्ड डीसीजेस’ नावाचे चॅप्टर समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र त्यात याच चॅप्टरमध्ये ‘कॉमन कोल्ड’ नावाने उपपरिच्छेद करून कोरोना विषाणूचा अगदी चार ओळीत उल्लेख करण्यात आला आहे. त्यात आजारीची लागण, लक्षणे, टाळण्याच्या उपाययोजना आदींविषयी एक शब्दही सांगितलेला नाही. उलट ही माहिती विद्यार्थ्यांनीच इंटरनेटवरून शोधावी, असा ‘प्रोजेक्ट’ देण्यात आला आहे.