अवैध वीज बिले रोखण्यासाठी नवी व्यवस्था
By admin | Published: April 2, 2015 03:00 AM2015-04-02T03:00:27+5:302015-04-02T03:00:27+5:30
शेतक-यांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता अवैधपणे होणारी वीज बिल आकारणी रोखण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती
मुंबई : शेतक-यांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता अवैधपणे होणारी वीज बिल आकारणी रोखण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत दिली.
चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्ध्यासह राज्यातील शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच अवैधपणे वितरीत केल्या जाणाऱ्या वीज बिलाबाबत भाजपाच्या शोभाताई फडणवीस यांनी अर्धा-तास चर्चेच्या माध्यमातून लक्ष्य वेधले. यावेळी बोलताना अशाप्रकारे अवैध वीज बिल आकारणी होत असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी मान्य केले. मीटर रीडिंगनेच वीज बिल आकारणी व्हावी आणि बिले वेळेवर शेतकऱ्यांपर्यंत पोचावीत, यासाठी शाखा अभियंत्यांकडे सर्व जबाबदारी सोपवित फिडर मॅनेजमेंट पद्धत लागू करण्यात येईल. याशिवाय एकाच फिडरवर सहा हजार वीज जोडण्या करून त्याचे एक युनिट बनविण्यात येईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. शिवाय ठेकेदारांनी चुकीची वीजबिले दिल्यास संबंधित ठेकेदाराची निविदा रद्द करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
व्यवस्थेत सुधारणा करतानाच तक्रारींच्या निवारणासाठी लोकप्रतिनिधी, तहसीलदार, पोलीस उप-अधीक्षक, निरीक्षक यांची समिती बनविण्यात येईल. दर तीन महिन्यांतून एकदा समितीची बैठक होईल. (प्रतिनिधी)