मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे साठी येणार नवी टोल कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 04:23 AM2019-06-20T04:23:18+5:302019-06-20T04:23:45+5:30
१५ वर्षांचा करार ऑगस्टमध्ये संपणार
मुंबई-मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर टोल जमा करणाऱ्या आयडियल रोड बिल्डर्सचा (आयआरबी) १५ वर्षांचा करार आॅगस्टमध्ये संपत असल्याने नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) नव्या कंपनीचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती एनएचएआयमधील सूत्रांनी दिली. त्यानुसार आता येथे नवीन टोल कंपनी येण्याची चिन्हे आहेत.
या टोल प्रकल्पाचे मूल्यांकन १.२० अब्ज डॉलर्स (७,००० ते ८,००० कोटी रुपये) इतके होईल, अशी एनएचएआयला आशा आहे. नवी टोल कंपनी शोधण्यासाठी एनएचएआयने एसबीआय कॅपिटल मार्केटस्ची कन्सल्टंट म्हणून नेमणूक केली आहे. एसबीआय कॅपिटल मार्केटसने या टोल प्रकल्पासाठी जागतिक स्तरावरील कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. यामध्ये मॅक्वरी, क्युब हायवेज व नॅशनल इन्व्हेस्टमेंटस अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ) या बलाढ्य गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे हा १९३ कि.मी. लांबीचा सहा पदरी हायवे २००२ साली वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खुला केला. २००४ साली हा प्रकल्प चालविण्यासाठी १५ वर्षांच्या करारावर आयआरबीला निविदेमार्फत मिळाला. २०१८-१९ या वर्षात या प्रकल्पातून ९१८ कोटी टोल जमा झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.