शिरूर लोकसभेच्या जागेवर नवा ट्विस्ट; आढळराव पाटील अजित पवार गटासोबत जाणार? मतदारसंघात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 12:39 PM2023-11-18T12:39:29+5:302023-11-18T12:41:06+5:30
शिरूरमध्ये सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता आहे.
पुणे - लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचाच अवधी असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अलीकडच्या काळात राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे मतदारसंघांतील समीकरणे बदलली असून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरेंना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र ज्या लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील तीन वेळा खासदार राहिले आहेत, त्या शिरूर लोकसभेवर भाजपकडूनही दावा सांगितला जात आहे. भाजप आमदार महेश लांडगे हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असल्याची चर्चा कायम रंगत असते. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा खासदार असल्याने लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपात अजित पवार यांच्याकडून या जागेवर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे कोल्हे यांच्याविरोधात लढण्यासाठी आढळराव पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही विचार करू शकतात.
दरम्यान, याबाबतच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. या चर्चेवर मी आताच काही प्रतिक्रिया देणार नसल्याचं आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात ते नक्की काय राजकीय भूमिका घेतात आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मार्ग निवडतात का, हे पाहावं लागेल.
शिरूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काय घडलं?
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यभरातील बहुसंख्य मतदारसंघांवर भाजप-शिवसेना या युतीने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ज्या मोजक्या जागांवर यश मिळवता आलं, त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून लाभलेली लोकप्रियता आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या ताकदीच्या जोरावर अमोल कोल्हे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. मात्र पराभवानंतर मागील पाच वर्षांत आढळराव पाटील यांनी वारंवार मतदारसंघ पिंजून काढला असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.