नवीन विद्यापीठ कायदा लागू
By admin | Published: March 2, 2017 05:27 AM2017-03-02T05:27:49+5:302017-03-02T05:27:49+5:30
राज्यात नवीन विद्यापीठ कायदा १ मार्चपासून लागू झाला आहे.
मुंबई : राज्यात नवीन विद्यापीठ कायदा १ मार्चपासून लागू झाला आहे. संशोधन मंडळ, नवउपक्रम, नवसंशोधन मंडळ, सल्लागार परिषद यांमधील उद्योग व संशोधन जगतातील तज्ज्ञांच्या सहभागाने विद्यापीठ शिक्षण अद्ययावत होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
विद्यार्थी स्पर्धात्मक युगात अधिक सक्षम बनेल. या कायद्यामुळे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीत होणार असून विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेमध्येही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कायद्यासंदर्भातील माहितीसाठी राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरू, कुलसचिव व शिक्षण तज्ज्ञांची मुंबई येथे ३ मार्चला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. नवीन विद्यापीठ कायद्यामुळे विद्यापीठ प्रशासनात अनेक बदल होणार आहेत. व्यवस्थापन मंडळातील नवीन सदस्यांची निवड विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यंत करावी लागणार आहे. तसेच व्यवस्थापन मंडळात विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून, विद्यार्थी महाविद्यालयीन जीवनापासूनच भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेशी जोडले जावेत यासाठी १९९४ पासून रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका आता या कायद्यामुळे होणार आहेत. (प्रतिनिधी)
>नवीन विद्यापीठ कायद्यात अनेक बदल करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना ‘चॉईस बेस’ शिक्षण घेता येणार आहे. महाविद्यालयीन निवडणुकांमुळे त्यांना भारतीय लोकशाही निवडणूक प्रक्रियेचा अनुभव घेता येणार आहे. शैक्षणिक दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा आहे.
- प्रा. पी. पी. पाटील, कुलगुरु,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ.