नवा वजीर, नव्या चाली

By admin | Published: April 30, 2015 11:43 PM2015-04-30T23:43:48+5:302015-05-01T00:15:38+5:30

कारण-राजकारण

New Wazir, New Tactics | नवा वजीर, नव्या चाली

नवा वजीर, नव्या चाली

Next

कमळाबाईच्या कार्यालयात म्हणे गहजब सुरू झालाय. कारण डीसीसी बँकेच्या निवडणुकीत शेतकरी सहकार पॅनेलमधल्या पाच जागांसाठी सगळा पक्ष इस्लामपूरकर साहेबांच्या अर्थात जयंतरावांच्या दावणीला बांधला गेलाय. जिल्ह्यात कमळाबाईचा एक खासदार आणि चार आमदार असतानाही असं अघटित घडलं कसं? अरेरे! काय म्हणावं याला? पक्षाची अधोगती की अवनती?... लोकसभेच्या निकालानंतर ‘केडर बेस’ पक्ष संघटनेचा, राजकीय चातुर्याचा, इलेक्शन मॅनेजमेंटचा आणि संजयकाकांना निवडून आणल्याचा (काका ऐका बरं!) टेंभा मिरवणाऱ्या तमाम भाजपेयींना आणि नंतर ‘कन्व्हर्ट’ झालेल्या मोदीसेनेला हा सवाल सतावतोय. (काकांबाबत ही मंडळी केवळ हातांचे इशारे आणि नेत्रपल्लवीतून एकमेकांना प्रश्न विचारतात बरं का! उघड नाही ना बोलू शकत!)तशी गेल्या सात-आठ वर्षांपासून कमळाबाईची फरफट सुरूच आहे की! चाळीस वर्षांच्या दोस्तान्याला जागत संभाजी पवारांनी जयंतरावांच्या मागं कमळाबाईला फरफटत नेलं होतं. ती फरफट दिसत असतानाही समजून-उमजून करण्यात आलेली सोयीची सोयरीक या बिचाऱ्यांनी स्वीकारली होतीच की! (भाजपेयींनी साधनशूचितेच्या गप्पा सांगलीत मारून चालत नाहीत, हेच खरं!) उलट आता या भाजपेयींनी आणि नंतर ‘कन्व्हर्ट’ झालेल्या मोदीसेननं संजयकाका, जगतापसाहेब, पृथ्वीराजबाबा यांना मानलं पाहिजे! या तिघांनी ‘डीसीसी’त जयंतरावांशी खुबीनं हातमिळवणी केलीय. (खरं तर जयंतरावांनीच त्यांना पंखाखाली घेतलंय! बारामतीकरांच्या फडातून कमळाबाईच्या तंबूत त्यांना पाठवण्यात, काहींना निवडून आणण्यात कोणाचा हात होता?) त्यातच संजयकाका आणि जगतापसाहेबांनी जुन्या दोस्तीची याद ताजी करत मदनभाऊंनाही आपल्या गोटात ओढलं आणि सोनसळकर कंपनीचे पुरेपूर उट्टे काढले. एकेकाळी ‘डीसीसी’ बँक म्हणजे काय रे भाऊ, असा सवाल करणाऱ्या कमळाबाईच्या वाट्याला दोन-तीन संचालकपदं येणार असल्याचं दिसतंय, ते कुणामुळं?
दुसरीकडं मदनभाऊंनी जयंतराव आणि कमळाबाईशी कसं जुळवून घेतलं, असा सवालही विचारला जातोय. भाऊंनी म्हणे स्वकियांचा हात सोडायला नको होता... असं म्हणणारे विधानसभेच्या दोन निवडणुकांत स्वकियांनीच भाऊंना केलेला दगाफटका विसरताहेत का? आणि सोनसळकर साहेबांचं जयंतरावांशी असलेलं ‘मॅचफिक्सिंग’ कोणालाच माहीत नाही का? ‘डीसीसी’ आणि वसंतदादा बँकेतल्या घोटाळ्यांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी भाऊंनी एक पाऊल मागं घेतलं, असं म्हणावं तर ‘डीसीसी’तल्या घोटाळ्यात बारामतीकरांच्या फडातली माणसं जशी अडकलीत, तशी कमळाबाईकडं गेलेली मंडळीही अडकलीतच की! बाजार समितीच्या इलेक्शनवर डोळा ठेवून भाऊंनी पडती बाजू घेतलीय, असाही सूर ऐकायला येतोय. खरं तर या सगळ्यांनाच एकमेकांचा टेकू पाहिजे. बदलत्या राजकारणाचा अदमास घेत यांची पावलं पडताहेत. ‘डीसीसी’तलं राजकारण वेगळं आणि इतर निवडणुकांतलं राजकारण वेगळं, असं कितीही म्हटलं तरी ‘डीसीसी’च्या निवडणुकीतच पुढल्या समीकरणांचं बीज रोवलं जाणारेय, हे दिसायला लागलंय.
आता एक नवाच प्रश्न समोर आलाय. विळ्या-भोपळ्याचं सख्य असणारे एकत्र आले खरे, पण ते एकमेकांना खरंच हात देणार का? त्यांचं बँकेपुरतं झालेलं मनोमीलन तिसरी-चौथी फळी मनावर घेणार का? जगतापसाहेबांचं जतमधल्या राष्ट्रवादीच्या एका गटाशी फाटलंय, तर मिरज तालुक्यातल्या मदनभाऊंच्या कार्यकर्त्यांनी घड्याळवाल्यांशी उभा दावा घेतलाय. विट्याच्या अनिलभाऊंचं संजयकाका आणि कमळाबाईशी अजिबात पटत नाही, तर तासगाव-कवठेमहांकाळला आबा गटाचं संजयकाका गटाशी असलेलं सख्य जगजाहीर आहे! त्यातच घोडेबाजार तेजीत आला तर गणितं बिघडलीच म्हणून समजा...
जाता-जाता : आर. आर. आबा गेल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सैरभैर झालेत. काही उत्साही आबाप्रेमींनी सुरेशभाऊंकडं नेतृत्व दिल्याचं जाहीर केलं, तरी ते नेतृत्व पोक्त नसल्याचं सांगितलं जातंय. नेमकं हेच हेरून जयंतरावांनी जाळं टाकलं आणि त्यात आबांची माणसं घावली! आज तासगावमधले आबांचे सत्तर टक्के कार्यकर्ते जयंतरावांचं ऐकू लागलेत, तर काही संजयकाकांच्या वळचणीला जायचं कारण शोधताहेत. कवठेमहांकाळमधला आबा गटाचे अनेकजण जयंतरावांकडं, तर काही जण संजयकाकांना जाऊन मिळालेत! या गटाची ही राजकीय अपरिहार्यता. विधानसभेच्या निवडणुकीत संजयकाकांच्या चिंचणीत आबांना कधीच ‘लीड’ मिळालं नव्हतं, पण यंदा पोटनिवडणुकीत सुमनतार्इंना चिंचणीनं ‘लीड’ दिलं. संजयकाकांनी अजितदादांना दिलेला शब्द पाळला. काय सांगावं... उद्याच्या राजकीय उलथापालथीत संजयकाका पुन्हा अजितदादा पवारांचे साथीदार बनतील आणि जयंतरावांना शह देणारा नवा वजीर निर्माण होईल... किंवा जयंतरावच बारामतीकरांचा तंबू बदलतील..!
- श्रीनिवास नागे

Web Title: New Wazir, New Tactics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.