नव्या वर्षाची झकास सुरुवात!
By admin | Published: February 24, 2017 06:12 AM2017-02-24T06:12:15+5:302017-02-24T06:12:15+5:30
सन २०१७ या वर्षाची ही झकास सुरुवात आहे. आधी ओडिशात अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला
नवी दिल्ली : सन २०१७ या वर्षाची ही झकास सुरुवात आहे. आधी ओडिशात अभूतपूर्व असा पाठिंबा मिळाला व आता महाराष्ट्रातील जनतेने भरभरून आशीर्वाद दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमधील भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्र भाजपाच्या संपूर्ण टीमने लोकांमध्ये जाऊन केलेल्या अथक कामानेच पक्षाला हे यश मिळाले, असे नमूद करून पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन दिले.
भाजपा नेते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना व भाजपाने पुन्हा एकत्र यावे, अशी भावना बोलून दाखवली आहे. ते कदाचित त्यासाठी पुढाकार घेतील, अशी शक्यता आहे.
शिवसेनेच्या मुंबईतील कामगिरीबद्दल उद्धव ठाकरे फारसे समाधानी नसून, ताकद असूनही जिथे उमेदवार पराभूत झाले, तेथील शाखाप्रमुख व विभागप्रमुख यांना दूर केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र त्यांनी भाजपाने सत्ता व संपत्तीचा प्रचंड वापर केला आणि मतदारयादीतून नावे गायब होणे हे षडयंत्र असू शकेल, असे म्हटले आहे.
बीडच्या परळी पंचायत समितीमध्ये भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देउ केला. पण प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी तो न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकमधील शिवसेनेच्या पराभवामुळे सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की या पराभवामुळे पक्ष वा नेते खचून गेलेले नाहीत. निवडणुकीत हार-जीत होतच असते. या पराभवाची पक्षाचे नेते निश्चितच मिमांसा करतील. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाच्या विकासाच्या धोरणांवर विश्वास दाखवून ‘सबका साथ, सबका विकास’ या अॅजेंड्याला साथ दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी अभिनंदन केले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, ओडिशात स्पर्धेबाहेर फेकली गेलेली काँग्रेस महाराष्ट्रात तिसऱ्या-चौथ्या स्थानावर गेली. महत्त्वाची राज्ये भाजपा स्वबळावर जिंकू शकते, हेच या दोन्ही राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी दाखवून दिले आहे.
( BMC ELECTION RESULT : ईश्वर चिठ्ठी भाजपाच्या नावे )
( BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत )