नववर्षही महागाईचेच!
By admin | Published: November 30, 2015 03:30 AM2015-11-30T03:30:29+5:302015-11-30T03:30:29+5:30
गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे.
मनोज गडनीस, मुंबई
गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे. भारतात यंदा झालेला पाऊस आणि त्याचा विविध पिकांना बसलेला फटका याची आकडेवारी काही आघाडीच्या बाजार विश्लेषक संस्थांनी प्रसिद्ध केली असून, त्यांच्या विश्लेषणानुसार यंदाच्या तुलनेत २०१६च्या वर्षात सरासरी कमाल १० टक्क्यांनी महागाईच्या दरात वाढ होताना दिसेल.
भारतीय अर्थव्यवस्थेचे विश्लेषण करणाऱ्या या कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून नववर्षात महागाईची चुणूक जावणते. उपलब्ध माहितीनुसार, देशात विविध अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्र, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतून पावसाची सर्वाधिक तूट
दिसून आली असून, याचा थेट फटका संबंधित राज्यांतील प्रमुख पिकांना मोठ्या प्रमाणावर
बसणार असल्याचा अंदाज आकडेवारीसह वर्तविण्यात आला आहे.
या सर्व पिकांचे उत्पादन, बाजारातील मागणी व पुरवठा यांचे गणित विस्कळीत होणार असल्यामुळे महागाई आणखी डोके वर काढेल, असे मत अर्थतज्ज्ञ अजय चारी यांनी व्यक्त केले.
दुग्धोत्पादनही घटणार
गेल्या दोन वर्षांपासून दुधाच्या उत्पादनात घट नोंदली गेली आहे. उत्पादनातील घट होण्याचा ट्रेण्ड नववर्षातही कायम राहण्याचे संकेत दूध उत्पादक संघटनांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यांच्या मते २०१६ या वर्षी देशातील दुधाच्या एकूण उत्पादनात ५ ते ७ टक्के घट होईल व याचा परिणाम दुधाच्या किमती वाढण्याच्या रूपाने दिसून येईल.
महागाई तेव्हाची
आणि आताची
२०११ ते २०१४ या कालावधीत भडकलेल्या महागाईत सातत्याने वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीचे तेल ओतले गेले होते. या ३ वर्षांत १०० ते १४५ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल असा कच्च्या तेलाचा दर होता. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला होता. परंतु, यंदा स्थिती उलट आहे. कारण, जून २०१४पासून आतापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीचा प्रवास हा सातत्याने घसरणीचा आहे.
तेलाच्या किमतीने ३८ अमेरिकी डॉलर प्रति बॅरल इतका नीचांक गाठून आता, हे दर ४५ ते ५० डॉलरच्या घरात आहेत. मात्र, तरीही घसरलेल्या तेलाच्या किमतीचा म्हणावा इतका फायदा होत नसल्याने आणि त्यातच कमी पाऊस यामुळे महागाईचा आलेख उंचावलेलाच आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या असलेल्या किमती आणि त्या अनुषंगाने भारतीय बाजारात दर कपात झाली तर, सध्या असलेली महागाई अडीच ते पाच टक्क्यांनी आटोक्यात आणणे शक्य होईल, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. अजय सहानी यांनी व्यक्त केले.
> या पिकांना सर्वाधिक फटका
खरीप पिकांचा हंगाम आता सुरू झाला असला तरी, पावसाच्या कमतरतेमुळे प्रामुख्याने तूर, चणा, मसूर, उडीद, ज्वारी, सोयाबीन, तांदूळ, गहू आदी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून, पाचही राज्यांतील सरासरी पिकांचे उत्पादन व मागणी पुरवठ्याचा विचार करता या उत्पादनांची तूटही ३४ टक्के इतकी असेल.
2014
मध्ये ही तूट
२८ टक्क्यांच्या आसपास होती. त्या तुलनेत नववर्षात ही
झळ अधिक बसणार आहे.
उत्पादनाचा विचार
करता आगामी सहा महिन्यांत या सर्व धान्यांच्या किमतीमध्ये
8-12%
वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कमी पावसामुळे जी परिस्थिती धान्याची आहे, तीच परिस्थिती
फळ आणि भाज्यांच्या बाजारातही आहेच. कोथिंबीर, कांदा, बटाटा, टोमॅटो तसेच विविध प्रकाराच्या भाज्यांचे दर आताच सरासरी २० रुपये पाव किलोच्या वर आहेत.
जरी नवीन पीक बाजारात आले
तरी मागणीच्या तुलनेत व्यस्त प्रमाणातील पुरवठ्याच्या गणितामुळे त्यांचेही दर वाढतानाच दिसत आहेत.
एप्रिल २०१६पर्यंत फळ-भाज्यांच्या किमतींमध्ये किमान ८ ते कमाल १५ टक्के इतकी वाढ होताना दिसेल.