नव्या वर्षातही लोकलचा ‘वक्तशीरपणा’ घसरला

By admin | Published: January 7, 2017 02:08 AM2017-01-07T02:08:33+5:302017-01-07T02:08:33+5:30

मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांत तांत्रिक बिघाडानंतरही लोकलचा वक्तशीरपणा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

In the new year, the local 'punctuality' dropped | नव्या वर्षातही लोकलचा ‘वक्तशीरपणा’ घसरला

नव्या वर्षातही लोकलचा ‘वक्तशीरपणा’ घसरला

Next


मुंबई : मध्य रेल्वेवर गेल्या दोन वर्षांत तांत्रिक बिघाडानंतरही लोकलचा वक्तशीरपणा चांगला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. २0१७मध्येही लोकल वेळेवर धावतील असे वाटत असतानाच गेल्या पाच दिवसांत वक्तशीरपणा चांगलाच घसरला. दररोज सरासरी ८८ टक्क्यांहून अधिक असणाऱ्या वक्तशीरपणात घसरण होऊन पाच दिवसांत तो ८२ टक्क्यांवर आला. त्यामुळे नव्या वर्षात तरी मध्य रेल्वेवरील लोकल वेळेवर धावणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मध्य रेल्वेमार्गावर अनेक तांत्रिक बिघाड होत असल्याने लोकल वेळेवर धावत नाहीत आणि त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एप्रिल ते डिसेंबर २0१६ दरम्यान जवळपास १,५00 विविध तांत्रिक बिघाड झाले. यामध्ये सर्वाधिक बिघाड लोकल व इंजिनातील असतानाच त्यानंतर सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि रुळांना तडा गेल्याचे आहेत. तर २0१५-१६मध्ये १ हजार १७0 तांत्रिक बिघाड झाले आहेत. या बिघाडांनंतरही २0१६मध्ये लोकलचा वक्तशीरपणा ८८ टक्क्यांपर्यंत राहिला. तर २0१५मध्ये ८६ टक्के एवढा वक्तशीरपणा होता. यातही डिसेंबर २0१६ मध्ये तांत्रिक बिघाडांचा सामना करूनही ८८.८८ टक्केपर्यंत वक्तशीरपणा गेला. नव्या वर्षात यात सुधारणा होऊन लोकल वेळेवर धावतील, अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. २0१७मधील पहिल्या पाच दिवसांचा मिळून लोकलचा वक्तशीरपणा हा ८२.३ टक्क्यांपर्यंत राहिला.
पाच दिवसांतच मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर मोठ्या प्रमाणात तांत्रिक बिघाडांचा सामना मध्य रेल्वेला करावा लागला. यात ट्रेनमधील बिघाड तीनपेक्षा अधिक, रुळाला तडा चारहून अधिक घटना तर सिग्नलमधील बिघाड जवळपास २५पेक्षा जास्त घडल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळेच लोकल वेळेवर धावू शकल्या नाहीत. मात्र नव्या वर्षात लोकल वेळेवर धावतील, यादृष्टीनेनियोजनही केले जात असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
> तांत्रिक बिघाडांचा फटका
दररोज सरासरी ८८ ते ९0 टक्क्यांपर्यंत लोकलचा वक्तशीरपणा असतो.
मात्र यात चांगलीच घसरण झाली. मध्य रेल्वेवरील मेन लाइन आणि हार्बरवर झालेल्या तांत्रिक बिघाडांचा फटका त्याला बसला.
२0१५मधील डिसेंबर महिन्यातही ८६.0७ टक्केपर्यंत वक्तशीरपणा राहिला.
२0१६मध्ये तांत्रिक बिघाडांमुळे ५,८९५ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या.

Web Title: In the new year, the local 'punctuality' dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.