नव्या वर्षात राज्यात थंडीचे आगमन; नाशिकचा पारा घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 09:24 PM2020-01-01T21:24:55+5:302020-01-01T21:37:46+5:30
पुण्यात यंदा प्रथमच पारा १० अंशावर
पुणे : अरबी समुद्रातील वातावरणात बदल झाल्याने संपूर्ण डिसेंबर महिन्यात राज्यातील तापमानात नेहमीच चढे राहिले असताना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील तापमानात घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १०़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़ विदर्भात मात्र अनेक ठिकाणी पाऊस पडला.
कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान आता सरासरीच्या जवळपास आले आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे.
२ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे १०. ८, लोहगाव ११.७, जळगाव १४.६, कोल्हापूर १६.१, महाबळेश्वर १३.१, मालेगाव १४.२, नाशिक १०.३, सांगली १५.३, सातारा ११.८, सोलापूर २०.३, मुंबई १७, सांताक्रुझ १५, अलिबाग १५.७, रत्नागिरी १७.१, पणजी २०.४, डहाणु १४.७, उस्मानाबाद १४.८, औरंगाबाद ११.६, परभणी १६.६, नांदेड १६.५, बीड १५.२, अकोला १३.९, अमरावती १३.६, बुलढाणा १३.८, ब्रम्हपुरी १२.९, चंद्रपूर १०.६, गोंदिया १४, नागपूर १३.४, वाशिम १५, वर्धा १३.८, यवतमाळ १४़
पुण्यात यंदा प्रथमच पारा १० अंशावर
संपूर्ण डिसेंबर महिन्यात थंडीची अतुरतेने वाट पहायला लावणाऱ्या पुणेकरांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली आहे़. यंदा प्रथमच शहरातील तापमान १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे़. पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़.