पोलीस अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट !
By Admin | Published: January 1, 2016 02:34 AM2016-01-01T02:34:50+5:302016-01-01T02:34:50+5:30
सरत्या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने राज्य पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल करीत २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी १७ अधिकाऱ्यांना नव्या वर्षाचे ‘प्रमोशन’ गिफ्ट मिळाले
मुंबई : सरत्या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारने राज्य पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल करीत २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यापैकी १७ अधिकाऱ्यांना नव्या वर्षाचे ‘प्रमोशन’ गिफ्ट मिळाले आहे. अन्य सहा अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या आहेत.
मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी, ठाणे शहरातील व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, मुंबई उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर आयुक्त फत्तेसिंग पाटील, वाहतूक शाखेचे विठ्ठल जाधव, एसीबीचे किशोर जाधव, नवी मुंबईचे अपर आयुक्त विजय चव्हाण, मुंबई झोन-१चे उपायुक्त रवींद्र शिसवे आदींना बढती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर गृह विभागाने बुधवारी रात्री उशिरा
बढती व बदल्यांचा आदेश जारी केला. नव्या वर्षात त्यांना तत्काळ नवनियुक्तीच्या ठिकाणी हजर व्हावयाचे आहे.
राज्यात ३५ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांची १३ हजारांवर पदे रिक्त असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २१ डिसेंबरला दिले होते. त्यानंतर अपर मुख्य सचिव (गृह) के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना मंडळाची बैठक घेऊन प्रमोशनसाठी पात्र असलेल्या ३ सहआयुक्त व १० अपर आयुक्त व ४ उपायुक्तांच्या बढतीचा प्रस्ताव तयार केला होता. मुंबईतील सहआयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुुलकर्णी व ठाण्याचे सहआयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांना अपर महासंचालक म्हणून बढती मिळाली आहे. सध्या ते कार्यरत असलेल्या ठिकाणच्या पदाची श्रेणी उन्नत करण्यात आली आहे; तर नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक जयजीत सिंघ यांची पदोन्नती महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय महासंचालकपदी करण्यात आली आहे. त्याशिवाय १० अपर आयुक्त व ४ उपायुक्तांना बढती मिळाली आहे. तर ३ विशेष महानिरीक्षक, त्यांच्याशिवाय नागपूरचे अपर आयुक्त श्रीकांत तरवडे यांची सीआयडीच्या पुणे विभागात आणि औरंगाबाद पीसीआर विभागातील उपायुक्त नितीन पवार यांची अमरावतीला उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
११३ निरीक्षकांनाही बढत्या
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच राज्यातील ११३ वरिष्ठ निरीक्षकांनाही सहाय्यक आयुक्त/ उपविभागीय अधिकारीपदी बढती दिल्याचे आदेश नववर्षाच्या पूर्वसंध्येला गृहविभागाने जारी केले. सेवाज्येष्ठतेवर सध्या आहे त्याच ठिकाणी त्यांना बढती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बढती मिळालेले अन्य अधिकारी (कंसात कोठून कोठे)
अपर आयुक्त ते विशेष महानिरीक्षक : राजकुमार व्हटकर (आयुक्त, अमरावती, पदश्रेणी उन्नत), कृष्णप्रकाश (सीआयडी- महानिरीक्षक, विशेष सुरक्षा), फत्तेसिंग पाटील (उत्तर प्रादेशिक- महानिरीक्षक मोटर परिवहन), शिवाजी बोडखे (ठाणे- नक्षलविरोधी अभियान, नागपूर), प्रकाश मुत्याल (एसआरपी, नागपूर), विठ्ठल जाधव (वाहतूक मुंबई- सीआयडी पुणे), प्रकाश रासकर (पुणे-एमआयए, पुणे), शहाजी साळुंखे (तुरुंग, पुणे, श्रेणी उन्नत), किशोर जाधव (एसीबी- मानवी हक्क आयोग), विजय चव्हाण (नवी मुंबई- वायरलेस पुणे), उपायुक्त ते अपर आयुक्त : डॉ. रवींद्र शिसवे (परिमंडळ-१ मुंबई- नागपूर), दत्तात्रय मंडलिक (सीआयडी पुणे, श्रेणी उन्नत), मकरंद रानडे (मुख्यालय पुणे- ठाणे शहर), केशव पाटील (ठाणे- मुंबई)