न्यूझीलंडसाठी ‘मौका भी.., दस्तूर भी..!’

By admin | Published: February 9, 2015 12:51 AM2015-02-09T00:51:43+5:302015-02-09T01:17:10+5:30

तब्बल सहावेळा उपांत्यफेरीत पोहोचूनही विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकवेळी भंगले, हा न्यूझीलंड क्रिकेटचा इतिहास आहे.

For New Zealand 'opportunity also .., Dastur also ..!' | न्यूझीलंडसाठी ‘मौका भी.., दस्तूर भी..!’

न्यूझीलंडसाठी ‘मौका भी.., दस्तूर भी..!’

Next

विश्वास चरणकर - कोल्हापूर -दहापैकी तब्बल सहावेळा उपांत्यफेरीत पोहोचूनही विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न प्रत्येकवेळी भंगले, हा न्यूझीलंड क्रिकेटचा इतिहास आहे. हा इतिहास बदलण्यासाठी ‘ब्लॅक कॅप्स’ यंदा प्रयत्न करणार आहेत. मायदेशात होणारी स्पर्धा आणि संघाची चांगली तयारी यामुळे या संघाला यंदा अभूतपूर्व संधी निर्माण झाली आहे. ही संधी त्यांनी साधली नाही तर त्यांच्यासारखे दुर्दैवी तेच. कसोटी दर्जा प्राप्त झालेला न्यूझीलंड हा पाचवा देश आहे. त्यांनी आपला पहिला वन-डे सामना १९७२-७३मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. १९७५ च्या विश्वचषकात त्यांनी ग्लेन टर्नरच्या नेतृत्वाखाली सेमीफायनलपर्यंत मजल मारली; पण तेथे त्यांची गाठ वेस्ट इंडीजच्या वादळाशी पडल्यामुळे त्यांना गाशा गुंडाळावा लागला.
१९७९च्या दुसऱ्या स्पर्धेतही त्यांनी सेमीफायनल गाठली; पण यावेळी त्यांना यजमान इंग्लंडने पराभूत केले. १९८३च्या विश्वचषकात सरस धावगतीच्या आधारे पाकिस्तान पुढे गेल्यामुळे न्यूझीलंडचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. १९८७च्या विश्वचषकातही ते पहिल्या फेरीतच बाहेर पडले.
१९९२चा विश्वचषक आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड या दोन देशांत झाला. मायदेशातील या स्पर्धेत न्यूझीलंडने राउंड रॉबीन फेरीत आठपैकी सात सामने जिंकून गुण तक्त्यात अव्वल स्थान गाठले होते. यातील एकमेव पराभव पाकिस्तानकडून झाला होता. सेमीफायनलमध्ये पुन्हा त्यांची गाठ याच पाकिस्तानशीच पडली. १४ गुण घेऊन आलेला न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलियापेक्षा केवळ एक गुण जास्त म्हणजे नऊ गुण मिळालेला पाकिस्तान यांच्यात झालेली सेमीफायनल पाकिस्तानने जिंकली आणि न्यूझीलंडचे स्वप्न पुन्हा एकदा भंग पावले.
यानंतर १९९९, २००७ आणि २०११ या तीन वेळेला सेमीफायनलमध्ये पोहोचूनही त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही, असा हा न्यूझीलंड संघ मायदेशातील स्पर्धेकडे मोठ्या आशेने पाहतो आहे.
प्रत्येक विश्वचषकात न्यूझीलंडची गणना ‘डार्कहॉर्स’ म्हणून केली जाते; पण हा विश्वचषक असा आहे की, ज्यामध्ये विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक संघ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याला कारणही तसेच आहे. संघाची धुरा आज ब्रँडन मॅक्युलम याच्याकडे आहे. तो सध्या फार्मात आहे आणि विशेष म्हणजे तो ‘कॉन्फिडंट’ आहे. त्याने सूत्रे हातात घेतल्यापासून संघाची वाटचाल सकारात्मक झाली आहे. तो स्वत: एनर्जेटिक असल्यामुळे त्याने संघातही जान आणली आहे. हाच आत्मविश्वास त्यांच्या हातात २0१५चा विश्वचषक देऊ शकतो. मार्टिन गुप्तील, केन विलियम्सन, रॉस टेलर, मिशेल मॅक्लेनघन अशी दमदार फळी न्यूझीलंडची फलंदाजी समृद्ध बनविते.
गोलंदाजीत त्यांच्याकडे वर्ल्डक्लास नावे नसली तरी मायदेशातील खेळपट्टीवर टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, अ‍ॅडम मिलने हे तुफान उधळू शकतात. फिरकी गोलंदाजीत त्यांची मदार डॅनिएल व्हिट्टोरी या जुन्या जाणत्या खेळाडूवरच आहे.
न्यूझीलंडसाठी यंदा ‘मौका भी है.. दस्तूर भी है.. !’, अशीच परिस्थिती आहे.

प्लस पॉइंट
आक्रमक कर्णधार, एनर्जेटिक संघ, स्ट्राँग बॅटिंग लाईनअप, मायदेशातील वातावरण, घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा यामुळे न्यूझीलंड संघ यंदा ‘हॉट फेव्हरेट’ आहे.


वीक पॉइंट
विश्वचषकात त्यांना सेमीफायनच्यापुढे जाता येत नाही, हे मनातून काढून टाकण्याचे आव्हान. वाढत्या वयाचा व्हिट्टोरीच्या कामगिरीवर झालेला परिणाम.

कोरी अँडरसन हा अष्टपैलू खेळाडू म्हणजे संघातील हीरा आहे. यंदाचा विश्वचषक ज्यांच्यामुळे गाजेल त्यापैकी अँडरसन एक आहे. तडाखेबंद फलंदाजी आणि मिडियम फास्ट गोलंदाजी व जोडीला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आधुनिक क्रिकेटचे फुल्ल पॅकेजच. वन-डेत त्याने ३६ चेंडूंत शतक झळकाविले आहे. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सकडून त्याने आपला जलवा दाखविला आहे. तो एकदा लयीत आला की रोखणे कठीण असते.

विश्वचषकातील कामगिरी

संघ असा..
ब्रँडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अँडरसन, ट्रेंट बोल्ट, ग्रँट एलिओट्ट, मार्टिन गुप्तील, टॉम लॅथम, मिशेल मॅक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, काईल मिल्स, अ‍ॅडम मिलाने, ल्युक राँची, टीम साउदी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिट्टोरी आणि केन विलियम्सन.

Web Title: For New Zealand 'opportunity also .., Dastur also ..!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.