नवी जाेडपी म्हणतात, दोघात तिसरा हवा कशाला?; मूल होऊ देण्याला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:27 AM2023-12-08T08:27:10+5:302023-12-08T08:27:24+5:30
जबाबदारी नको या विचारातून निर्णय
अंकिता कोठारे
पुणे : मुले होणे ही देवाची इच्छा... या समजातून पूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया केली जात नसे. प्रगतीच्या वाटेवर आलेल्या मंडळींनी यात बदल करून ‘हम दाे, हमारे दाे’ अशी भूमिका घेतली. पुढे ‘हम दाे हमारा एक’ आणि आता बस्स म्हणत... फक्त ‘हम दाे’चा विचार नवी पिढी करत आहे. ही नवी पिढी तर ‘दोघात तिसरा हवा कशाला?’ असा प्रश्न करू लागली आहे. पुण्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकार सांगत आहेत.
का घेतला जाताेय हा निर्णय?
मेघा आणि राजेश (नावे बदलेली आहेत) यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली. समारंभात गेले की, नातेवाईक ‘घरात पाळणा कधी हलणार?’ असा प्रश्न करून भंडावून साेडत असत. त्यामुळे दोघांनीही समारंभालाच जाणे सोडून दिले. कारण त्या दोघांनाही मूल नको होते. मुले होऊच न देण्याच्या निर्णयापर्यंत काही जोडपी येऊन पोहोचली आहेत. विचारपूर्वक मुले न हाेऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या जाेडप्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
‘मूल नको’ म्हणून माझ्याकडे समुपदेशन घ्यायला येणारी सध्या ५ ते ६ जोडपी आहेत. ‘एकमेकांना द्यायला वेळ नाही, मग मुलाचा सांभाळ कोण करेल?’ अशा त्यांच्या भावना आहेत. - शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ.
इतर कारणे
करिअरला प्राधान्य
मुलांची जबाबदारी अनेकदा महिलांवरच टाकली जाते. त्यामुळे अनेक महिलांना मूल झाल्यावर खूप मोठी चूक केल्याची भावना मनात येते.
आई-वडिलांची भांडणे : अनेकदा पालकांनी मुलांसमोर ज्या गोष्टी बोलू नये त्या बोललेल्या असतात. कुठे तरी त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. अशा गोष्टींमधूनदेखील सध्या अनेक जोडपी मुले नको, असा निर्णय घेत आहेत.