वेळेत उपचार न मिळाल्याने पालघरमध्ये नवजात बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 06:22 AM2023-02-27T06:22:30+5:302023-02-27T06:22:50+5:30
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार
रवींद्र साळवे
लोकमत न्यूज नेटवर्क
मोखाडा : पालघर जिल्ह्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातेला वेळेवर उपचार न मिळाल्याने प्रसूतीनंतर नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली.
या घटनेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व संबंधित यंत्रणा जबाबदार असून दोषींवर कडक कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.
खोडाळा येथील तळ्याचीवाडी येथील मयूरी अनिल वाघ (वय १९) या गरोदर मातेला रविवारी दुपारी २.३० वाजेच्या दरम्यान पोटात दुखू लागल्याने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा येथे दाखल केले, परंतु तेथे उपचार न करता उपचार प्रक्रियेला गरोदर माता व नातेवाईक सहकार्य करत नसल्याचे कारण पुढे करून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यास डॉक्टरांनी सांगितले, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मोखाड्याचा एक तासाचा प्रवास करून ग्रामीण रुग्णालयात दाखल होताच १५ मिनिटांत महिला बाळंत झाली, मात्र बाळ दगावले. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळाले असते तर बाळ दगावले नसते. घटनेला उपकेंद्राचे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी गरोदर मातेचे वडील काशिनाथ भोई यांनी केली आहे.
आधीही गेले आहेत बळी
खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभारामुळे याअगोदरही अनेकदा बळी गेले आहेत. यामुळे वारंवार घडणाऱ्या प्रकाराला जबाबदार कोण? यावर कुणी कारवाई करणार आहे की नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
रुग्णालयांतील पदे रिक्त
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांवर योग्य प्रकारे उपचार होत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याच्या घटना सर्रास घडत असतात. यामुळे नाराजी व्यक्त होत असून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली जात आहे.
रुग्णालयाचे म्हणणे काय?
याबाबत अधिक माहितीसाठी खोडाळ्याचे वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोग्य सेवेच्या कामात आहे, नंतर बोलतो, असे सांगितले.
तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले की, मी या घटनेची माहिती घेतली असून सोनोग्राफीनुसार बाळाचे आकारमान जास्त होते व त्याच्या मानेला नाळेचा वेढा होता. ही प्रसूती करणे कठीण होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. याची आम्ही चौकशी करू.
ग्रामीण रुग्णालयात सेवेवर असलेले डॉक्टर देवधरे यांनी सांगितले की, वेळेत उपचार झाले असते तर बाळ वाचले असते.