नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 01:06 PM2019-11-02T13:06:40+5:302019-11-02T13:52:48+5:30
मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीने यश संपादन केल्यानंतर या दोन्ही पक्षात सत्तासंघर्ष सुरु आहे. मात्र असे असतानाच या दोन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे. मुख्यमंत्री कुणाचा होणार याबाबत अजून संभ्रम आहे. पक्षपातळीवर हा घोळ सुरू असताना राज्यातील भाजप-शिवसेनेच्या आमदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक आमदार मुबईत ठाण मांडून बसले आहेत, तर काही जणांचे अप-डाऊन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १०५ तर शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून ह्या दोन्ही पक्षात वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरीही युतीचेच सरकार येणार असल्याचा दावा सुद्धा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असणार आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र असे असताना दोन्ही पक्षाकडून सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी ह्या साठी निवडून आलेल्या आमदारांकडून मोर्चेबांधणी सुरु असून, इच्छुक आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
गेल्यावेळी मंत्रिमंडळात असलेले आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांकडून सुद्धा, पुन्हा मंत्रीपद मिळावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. मात्र भाजप-सेनेत सुरु असलेल्या वादामुळे या इच्छुकांचा हिरमोड होताना दिसत आहे. मात्र या दोन्ही पक्षातील वाद कोणत्याही क्षणी मिटू शकतो, आणि तसे झाल्यावर मंत्रिमंडळातील आपली संधी जाऊ नयेत म्हणून अनेक आमदारांनी आठवड्याभरापासून मुबईत मुक्काम ठोकला असल्याचे पाहायला मिळत आहे.