नवविवाहित दांपत्याची आत्महत्या
By admin | Published: June 25, 2016 12:41 AM2016-06-25T00:41:36+5:302016-06-25T00:41:36+5:30
केवळ आठच महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या एका दांपत्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे ही घटना घडली आहे.
गराडे : केवळ आठच महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या एका दांपत्याने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे ही घटना घडली आहे.
सारिका योगेश गायकवाड (वय २२), योगेश पंढरीनाथ गायकवाड (वय २७, दोघेही रा. हिवरे, ता. पुरंदर) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे
नाव आहे. श्रीधर गणपत गायकवाड यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री दोघेही कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यांचा सर्वत्र शोध घेतला; परंतु ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यानंतर मृत योगेश गायकवाड याचा मोठा भाऊ संतोष पंढरीनाथ गायकवाड याने सासवड पोलीस ठाण्यात २३ जून रोजी प्रथम दोघेही हरविल्याची तक्रार नोंदविली.
दरम्यान, आज शुक्रवारी( दि. २४) श्रीधर गणपत गायकवाड यांना हिवरे येथील काळेशिवार भागातील
एका शेतामध्ये आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने या दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर त्यांनी इतर काही व्यक्तींना बरोबर घेऊन पाहणी केली असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. यासंदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
त्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. याबाबत पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे पुढील तपास करीत आहेत.