महाराष्ट्र धर्मवाद्यांकडे गेल्याची खंत : मोहिते
By admin | Published: October 21, 2014 09:23 PM2014-10-21T21:23:15+5:302014-10-21T23:39:30+5:30
काही मुस्लीम बहुल भागात एमआयएमसारख्या पक्षांना मुस्लीम बांधवांनी मतदान केले
चिपळूण : त्रिशंकू विधानसभेत कट्टर हिंदुत्ववादी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून ते कोणतेही समीकरण जुळवायला तयार आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या सत्तेची धुरा धर्मवादी राजकारण्यांकडे जाणे ही शोचनीय बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी केले. राष्ट्रसेवा दल आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिर, चिपळूण यांच्यावतीने यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. भाजपला अध्यक्षीय लोकशाहीबद्दल प्रचंड आकर्षण आहे. त्यांना ती पद्धत भारतातही लागू करायची आहे. म्हणूनच आपल्या संविधानात तरतूद नसतानाही भाजपने त्याच पद्धतीने लोकसभा निवडणूक लढविली. तशीच विधानसभेची निवडणूकही लढविली. महाराष्ट्रात भाजपला वाढविण्यासाठी अगोदर ठरवलेल्या नियोजनाप्रमाणे युती तोडण्यासाठी शिवसेनेला भाग पाडले गेले. त्यामध्ये विविध क्लुप्त्या काढून त्यात शिवसेनेला अडकविण्यात आल्याचा आरोपही यावेळी मोहिते यांनी केला. काही मुस्लीम बहुल भागात एमआयएमसारख्या पक्षांना मुस्लीम बांधवांनी मतदान केले आहे. हीदेखील शोचनीय बाब असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुनील खेडेकर, श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर, युयुत्सू आर्ते, भारत घुले, संदेश पवार, शंकुतला लढ्ढा, सुरेश मोहिते, सुनील खेडेकर, प्रभाकर सकपाळ उपस्थित होते. (प्रतिनिधी)