पुढील 48 तासांत राज्यभर कोसळधारा; मुंबई, कोकणासह मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:02 PM2018-07-08T17:02:45+5:302018-07-08T17:03:04+5:30
उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने धिंगाणा घातला असतानाच ९ आणि १० जुलै रोजी उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. दरम्यान, रविवारी मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या मुसळधार पावसाने येथील रस्ते आणि रेल्वे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली; तर ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मुंबई पुन्हा एकदा पाण्यात गेल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी उत्तर कोकणात म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. १० जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हयात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. दक्षिण मध्य महाराष्ट्राचा विचार करता ९ जुलै रोजी सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल. १० जुलै रोजी सातारा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल.
उत्तर मध्य महाराष्ट्राचा विचार करता ९ जुलै रोजी जळगाव जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १० जुलै रोजी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. मराठवाड्याचा विचार करता ९ जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातुर जिल्हयात मुसळधार पाऊस पडेल. १० जुलै रोजी जालना आणि औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील.