मी ठरवणार यापुढचा मुख्यमंत्री - जानकर
By admin | Published: June 26, 2016 02:45 AM2016-06-26T02:45:16+5:302016-06-26T02:45:16+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. दुर्लक्षित समाज घटकाचा पाठिंबा या पक्षाला मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. यापुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे
सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढते आहे. दुर्लक्षित समाज घटकाचा पाठिंबा या पक्षाला मिळत असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती येईल. यापुढचा मुख्यमंत्री मीच ठरवणार आहे, असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केला.
सोलापुरातील अंबर मैदानावर रासपचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा शनिवारी दुपारी पार पडला. त्या वेळी मेळाव्यास मार्गदर्शन करताना जानकरांनी पक्षाची पुढील रणनीती मांडली. ते म्हणाले, १३ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली. निवडणुकीच्या गणितात मी कमी पडलो. मराठवाड्यात अडचण नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात खूप काम करावे लागणार आहे. फाटक्या माणसांमध्ये आम्ही विश्वास निर्माण करू शकलो. त्याच बळावर गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तराखंड या चार राज्यांत पक्षाला मान्यता मिळाली आहे. पक्षाला राष्ट्रीय चेहरा देण्यासाठी यापुढची रणनीती मला आखावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
रासपचे सोशल इंजिनीअरिंग
केवळ धनगरांचा पक्ष म्हणून रासपची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आ. जानकर यांच्याकडून केला जात आहे. आजच्या मेळाव्यात दलित, मुस्लीम, मराठा, लिंगायत, माळी आदी दुर्लक्षित समाज घटकाला सोबत घेऊन यापुढची राजकीय वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.