मुंबईसह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार; पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 07:54 AM2021-09-12T07:54:09+5:302021-09-12T07:55:25+5:30
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन गणेशोत्सवात राज्यावर अस्मानी संकट आले आहे. पुढील चार दिवसात मुंबई आणि राज्यभरातील विविध जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने कहर केला असतानाच आता बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवामानात झालेल्या या उल्लेखनीय बदलामुळे चार ते पाच दिवसात पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यभरात पावसाने आपला जोर कायम ठेवला आहे. मुंबईत सातत्याने सरीवर सरी कोसळत असून, श्री गणेशाचे स्वागतदेखील वरूण राजाने मोठ्या थाटामाटात केले. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. पावसाने संततधार कायम ठेवली असली तरीदेखील गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.
पालघर, ठाणे, रायगडला ऑरेंज अलर्ट
- कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर कायम राहील. जिल्ह्याचा विचार करता पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
- तर १३ आणि १४ सप्टेंबर रोजी गोवा, कोकण याठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.