महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे

By admin | Published: March 18, 2015 01:35 AM2015-03-18T01:35:01+5:302015-03-18T01:35:01+5:30

गुजरातमध्ये १३ लाख १८ हजार ५० कोटी रुपयांची तर महाराष्ट्रात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात दिसते.

Next to Gujarat | महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे

महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे

Next

मुंबई : गेल्या २३ वर्षांमधील औद्योगिक गुंतवणुकीचा विचार केला तर महाराष्ट्रापेक्षा गुजरात पुढे असल्याचे दिसते. गुजरातमध्ये १३ लाख १८ हजार ५० कोटी रुपयांची तर महाराष्ट्रात १० लाख ६३ हजार ३४२ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे आर्थिक पाहणी अहवालात दिसते.
औद्योगिक गुंतवणुकीचे १८ हजार ७०९ प्रस्ताव १९९१ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्राकडे आले. गुजरातकडे १२ हजार ५८४ प्रस्ताव आले. मात्र, गुंतवणुकीबाबत गुजरातने महाराष्ट्रावर आघाडी घेतली. देशात झालेल्या औद्योगिक गुंतवणुकीत गुजरातचा वाटा १२.२३ टक्के आहे तर महाराष्ट्राचा वाटा आहे, ९.८६ टक्के. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका आणि मॉरिशस हे प्रमुख देश असून, या गुंतवणुकीत अनुक्रमे १४ आणि १३ टक्के वाटा आहे.

रद्द एसईझेडने नुकसान : रद्द झालेल्या किंवा मागे घेण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रांमुळे (एसईझेड) राज्याचे नुकसान झाले. या एसईझेडद्वारे ४ लाख ६८ हजार जणांना रोजगार मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र एकही रोजगारनिर्मिती झाली नाही. १८ हजार ४०० कोटी रुपयांच्या अंदाजित गुंतवणुकीपैकी एक छदामही गुंतवणूक झाली नाही.
उद्योगांना भरीव अनुदान : राज्यातील उद्योगांना गेल्या वर्षी डिसेंबर २०१४पर्यंत १ हजार ७६२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले. त्यात विशाल प्रकल्पांना दिलेल्या
१ हजार ५३० कोटी रुपयांचा वाटा मोठा आहे.
सावकारी कर्जामध्ये वाढ : राज्यात परवानाधारक खासगी सावकारांच्या कर्जाच्या प्रमाणात आधीच्या वर्षीच्या तुलनेत २०१४-१५मध्ये वाढ झाली. २०१३मध्ये ८ लाख ४५ हजार ६९५ जणांवर ६५५ कोटी ६१ लाख रुपये कर्ज होते. २०१४-१५मध्ये ८ लाख ५१ हजार ५६४ जणांवर ७१९ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्ज होते.

Web Title: Next to Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.