शेतकऱ्यांचे समाधान करूनच महामार्ग पुढे नेऊ - एकनाथ शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:07 AM2017-07-21T02:07:45+5:302017-07-21T02:07:45+5:30
शेतकऱ्यांचे संपूर्ण समाधान करूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पुढे नेण्याची मुख्यमंत्री व राज्यशासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री
- लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांचे संपूर्ण समाधान करूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम पुढे नेण्याची मुख्यमंत्री व राज्यशासनाची भूमिका असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी येथे स्पष्ट केले. त्यांच्या उपस्थितीत गुरुवारी महामार्गासाठी जिल्ह्यातील पहिली जमीन खरेदी झाली.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमीन जाणाऱ्या बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक व जालना तालुक्यातील कडवंची या गावात शेतकऱ्यांशी शिंदे यांनी संवाद साधला. या वेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांची संमती घेऊन योग्य मोबदला मिळवून द्या, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुरुवातीपासूनची भूमिका असून, ती कायम असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. स्वच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे पैसे जमा करण्यात येणार आहे, असेही शिंदे म्हणाले. तालुक्यातील बहुतांश बागायती जमीन कोरडवाहू दाखविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यात तातडीने बदल करावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांसह कृती समितीने केली़
औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ‘समृद्धी’ महामार्गाला वळण देण्याची मागणी आहे. त्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांचे पथक संयुक्त पाहणी करील. त्यानंतर भूसंपादनाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने होईल.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम)