पुढील साहित्य संमेलन तीन महिन्यांच्या आत; महामंडळाच्या बैठकीत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 06:27 AM2021-12-05T06:27:56+5:302021-12-05T06:28:20+5:30
कोरोनाच्या दोन लाटा आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनापेक्षा मेाठ्या विलंबाने भुजबळ नॉलेज सिटीत हे संमेलन भरविण्यात आले.
नाशिक : येथे सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप रविवारी वाजणार असून, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. पुढील संमेलन या आर्थिक वर्षाच्या आत म्हणजे मार्चपूर्वी घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार असून, त्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीरची निवड करण्यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या दोन लाटा आणि त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध दूर करण्यात आल्यानंतर पूर्वनियोजनापेक्षा मेाठ्या विलंबाने भुजबळ नॉलेज सिटीत हे संमेलन भरविण्यात आले. दोन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरही चर्चा
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा मु्द्दा या संमेलनात पुन्हा चर्चिला गेला. त्यातही असा दर्जा देण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने केंद्र शासनाला अहवाल दिल्याने आता हा दर्जा मिळावाच ही मराठी जनांची आणि सारस्वतांची भावना केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संमेलनात तसा ठराव होणे अटळ मानले जात आहे. याशिवाय आगामी संमेलन स्थळाबाबतदेखील प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
आज समारोप
या संमेलनाचा समारोप रविवारी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.
फडणवीसांची पाठ
अखिल भारतीय साहित्य संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये येऊनही साहित्य संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला.