पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाच होईल – जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:30 PM2018-08-15T16:30:57+5:302018-08-15T16:31:41+5:30

या देशातील आर्थिक,सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडयाखाली गेली अनेक वर्ष वाढवलेली आहे.

The next speech will be from the Red Fort on next Independence Day - Jayant Patil | पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाच होईल – जयंत पाटील

पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाच होईल – जयंत पाटील

Next

मुंबई :  या देशातील आर्थिक,सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडयाखाली गेली अनेक वर्ष वाढवलेली आहे. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ज्या उद्देशाने पक्षाची स्थापना करुन देशाची आणि राज्याची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं पुढचं पाऊल टाकण्याची ताकद स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी येवो आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाचा हा दिवस आपल्या सर्वांना शुभेच्छा देवून आणि आज पक्षातील उत्साह बघून पुढच्या स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसंच होईल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली अनेक वर्ष या देशात प्रगतीचा विचार आपण करत होतो. परंतु गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होवू लागली आहे. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर या देशात आतापर्यंत आम्ही जी प्रगती साधली तो प्रगतीसाठीचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाचं पुढचं पाऊल पडेल असा विश्वास वाटत होता. परंतु आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर या देशातील एखादया बॅंकेतील पैसेच आपोआपच दुसऱ्या बॅंकेत निघून जातात. या देशातील निवडणूका एका दिवसात घेण्याचा प्रयत्न सुरु असताना त्याही शक्यता बदलून वेगवेगळे घटक शंका व्यक्त करतात. या देशातील व्यवस्था भविष्यकाळाकडे बघत असताना या देशातील रुपयादेखील ७० रुपयाच्या वर जायला लागतो हे पाहायला मिळत आहे असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

या देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं त्या उन्नतीचा फायदा या देशातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला झाला पाहिजे ही महात्मा गांधीजींची स्वातंत्र्य मिळवतानाची कल्पना होती. ती आपण जवळपास ६० वर्ष सांभाळण्याचा प्रयत्न केला. म्हणून मागील तीन-चार वर्षात सर्व जातीधर्मांना एकत्र घेवून जाणारा भारत पुन्हा एकदा मागे वळतोय की काय अशी शंका या देशातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे अशी भीतीही आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

साडेतीन वर्षात या देशातील जनतेने विश्वासाने हात दिला त्याबद्दल आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतातील माणूस कधीही नाऊमेद झाला नाही अशी अनेक संकटे या देशातील जनतेने झेलली आहेत. मनात नसताना व्यवस्था दूर करण्यासाठी भारतीय लोकशाहीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओतलेला जो प्राण आहे त्याचा सतत आपणाला सगळयांना उपयोग झालेला आहे. या देशाची लोकशाही एवढी बळकट आहे की, सामान्य माणसं एवढी सामान्यपणे विचार करत जगत असतील तरी एवढा दुरगामी विचार करतात की, देशाच्या प्रगतीतील कोणताही अडथळा दुर करण्याचा सतत प्रयत्न जनतेने केला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भारतातील जनता या देशाला अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करणारी आहे आणि म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी सामान्य माणसाच्या मनातील भारत तयार करण्याचा प्रयत्न आणि ताकद आपल्यामध्ये येवो अशा शुभेच्छा जयंत पाटील यांनी जनतेला दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार विदया चव्हाण, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवादलाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: The next speech will be from the Red Fort on next Independence Day - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.